Join us

वाहनचोरांपुढे पोलीस हतबल

By admin | Published: July 16, 2014 1:05 AM

इंडियन मुजाहिददीनच्या अतिरेक्यांनी नवीमुंबईतून कार चोरून त्यांचा वापर गुराजतेत बॉम्बस्फोट घडविण्यासाठी केला. त्यानंतर देशभरातील सुरक्षायंत्रणांनी वाहन चोरीचा गुन्हा गांभीर्याने घेतला

जयेश शिरसाट, मुंबई इंडियन मुजाहिददीनच्या अतिरेक्यांनी नवीमुंबईतून कार चोरून त्यांचा वापर गुराजतेत बॉम्बस्फोट घडविण्यासाठी केला. त्यानंतर देशभरातील सुरक्षायंत्रणांनी वाहन चोरीचा गुन्हा गांभीर्याने घेतला. असे असले तरी चोरी झालेली आणि तपासांती सापडणारी वाहने यात प्रचंड तफावत आढळते. चोरीची पद्धत, प्रत्येक टोळीची लीफ्टर, कॅरिअर, एजंट, डीलर अशी लांबच लांब पसरलेली आंतरराज्यीय साखळी यामुळे पोलीस वाहन चोरांसमोर हतबल झालेले दिसतात.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या अहवालानुसार गेल्यावर्षी देशभरातून तब्बल १, ६७, ८३८ वाहने चोरी झाली. त्यापैकी फक्त ३९ हजार वाहनांचाच शोध लावण्यात पोलिसांना यश आले. हे प्रमाण जेमतेम २० टक्के इतके आहे. याच आकडेवारीनुसार दिवसाकाठी देशातून ४५९, महाराष्ट्रातून ५० तर मुंबईतून १० वाहने गूल होतात. गेल्यावर्षी महाराष्ट्रातून १८३९४ वाहने चोरी झाली आहेत. वाहनचोरीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. सर्वाधिक २४९४८ वाहने उत्तरप्रदेशातून चोरी झाली आहेत. त्यापाठोपाठ राजस्थान, हरयाणा, मध्यप्रदेश आणि दिल्ली ही राज्ये पहिल्या पाचात आहेत. यापैकी दिल्लीत तुलनेने कमी वाहने चोरी झाली असली तरी दरलाख लोकसंख्येमागे या राज्यात ७६ वाहने चोरी होतात. महाराष्ट्रात हेच प्रमाण १६ आहे. देशातल्या प्रमुख शहरांपैकी दिल्लीत(दिल्ली शहर) सर्वाधिक १३८५९ वाहने चोरी झाली. मुंबईत चोरी झालेल्या वाहनांची संख्या ३७८९ आहे. राज्य असो किंवा शहर प्रत्येक ठिकाणी सरासरी २० ते २५ टक्केच चोरी झालेली वाहने पोलीस हस्तगत करू शकले. विशेष म्हणजे वाहने सापडली तरी ती चोरून विकेपर्यंतची पूर्ण साखळी मात्र उध्वस्त करणे अद्याप देशातल्या पोलिसांना अद्याप शक्य झालेले नाही.याबाबत विचारणा केली असता पोलीस सांगतात, वाहनचोरी हा संघटीत गुन्हा आहे. कार चोरणारे लीफ्टर, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारे कॅरिअर आणि अखेरीस ती स्वीकारून पुढे विकणारे एजंट किंवा डीलर अशा पाच ते सहा टप्प्यांमध्ये चोरी झालेले वाहन फिरते. मात्र आधीच्याला पुढच्याची माहिती नसते. बऱ्याचदा दोघांनी एकमेकांचे चेहेरेही पाहिलेले नसतात. त्यामुळे प्रत्यक्ष चोराला जरी अटक झाली तरी त्याच्याकडून ही गाडी पुढे कोणाला दिली ही माहिती मिळवणे कठिण होऊन बसते. तसेच मुंबईतून चोरलेल्या गाडया अन्य राज्यांमध्ये विकल्या आणि वापरल्या जातात. तेथील पोलीस वाहने पकडतात. त्यांना ही गाडी कोणी विकत घेतली, कोणी विकली तेही सापडतात त्याआधीची साखळी मिळत नाही.