ड्रमबीटनंतर मुंबईच्या ‘छमछम’कडे पोलिसांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:17 AM2018-03-18T01:17:28+5:302018-03-18T01:17:28+5:30
ड्रमबीट बारच्या कारवाईनंतर मुंबईच्या छमछमकडे पोलिसांनी मोर्चा वळविला आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत बारवरील कारवाईला वेग आलेला दिसून येत आहे. त्यामुळे शहर, उपनगरातील बारमालकांची तारांबळ उडाली आहे.
मुंबई : ड्रमबीट बारच्या कारवाईनंतर मुंबईच्या छमछमकडे पोलिसांनी मोर्चा वळविला आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत बारवरील कारवाईला वेग आलेला दिसून येत आहे. त्यामुळे शहर, उपनगरातील बारमालकांची तारांबळ उडाली आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सून माधवी ठाकरे यांच्या मालकीच्या ड्रमबीट बारवरील कारवाईमुळे मुंबईत
खळबळ उडाली. बारमध्ये आॅर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू असल्याबाबत वारंवार तक्रारी येऊनदेखील पोलिसांनी त्याकडे
दुर्लक्ष केले. ही बाब पोलीस
आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी स्वत:
या प्रकरणाची दखल घेतली.
त्यांच्या आदेशानंतर अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी या बारवर कारवाई केली आणि येथील छमछम बंद केली.
याच कारवाईतील दिरंगाईमुळे ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. त्यांच्या बदलीमुळे अन्य वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी धास्ती घेतली आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच आपल्या हद्दीतील बारवरील कारवाई वेगात सुरू केली आहे. दहिसर पोलीस ठाण्याअंतर्गत २, मालाड, मालवणी, नागपाडासह, पूर्व उपनगर व विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रत्येकाने रोज एक
तरी गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आदेशच कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे खबºयांमार्फत या छुप्या छमछमवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे.