मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडच्या कुंपणाचे काम पूर्ण होईपर्यंत ७० पोलिसांची चमू तेथे तैनात राहणार आहे. त्यामुळे पोलिसांचे काम फक्त गस्त घालण्याचे असणार आहे. त्यात सोमवारी या ठिकाणी आग लावत असलेल्या ४ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.रविवारी याच ठिकाणातील कचऱ्याला जाळून त्यातून धातू गोळा करण्याचा खटाटोप सुरूअसताना देवनार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजाराचा दंड वसूल करून त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणात आणखी काही भंगार विक्रेत्यांना अटक होण्याची शक्यता असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.मोठ्या प्रमाणात कारवाई होत असतानादेखील देवनार डम्पिंग ग्राउंडच्या भिंतींना असलेल्या भगदाडीमुळे यातून आजही प्रवेश केला जात आहे. येथील भगदाडे बुजविण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे. दरम्यान, ग्राउंडच्या कुंपणाचे काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी ७० पोलिसांचा चमू गस्त घालणार आहे. त्यानुसार, शिवाजीनगर, देवनार आणि चेंबूर पोलीस ठाण्यातील पोलिसांना याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलीस आणि पालिका यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी पालिकेच्या निष्काळजीपणाबाबत दुसऱ्या टप्प्यात चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)
डम्पिंग ग्राउंडवर पोलिसांचा पहारा
By admin | Published: April 19, 2016 3:47 AM