शेफाली परब-पंडित, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले असल्याने मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २५ वर्षांची युती तुटल्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आपसात भिडत आहेत. तर मनसे आणि शिवसेनेत प्रतिष्ठेची लढाई सुरु आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी या पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महापालिका व पोलीस यंत्रणेने सर्वेक्षण करून मुंबईतील ६८८ मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. तर १७ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. या ठिकाणी मतदानाच्या दिवशी तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ३५ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त व वेबकास्ट कॅमेराची नजर असणार आहे.
मुंबई महापालिका २०१७ साठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिकेच्या २२७ जागांसाठी २२७५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यासाठी २३ निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईमध्ये १५८२ ठिकाणी ७३०४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच ६८८ मतदान केंद्र संवेदनशील तर १७ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. या ठिकाणी मतदानाच्या दिवशी तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पालिका कर्मचारी व पोलिसांचा जागता पहारा या मतदान केंद्रांवर असणार आहे.
* या निवडणुकीत एकूण ९१ लाख ८० हजार ४९१ मतदारांची नोंद झाली आहे. त्यापैकी ५० लाख ३० हजार ३६१ पुरुष, ४१ लाख ४९ हजार ७४९ महिला तर ३८१ तृतीयपंथीय मतदार आहेत.
*प्रभाग क्रमाक १६४ मध्ये ३१ उमेदवार असल्याने तीन वोटिंग मशीन लावले जाणार असून ३७ ठिकाणी १५ हून अधिक उमेदवार असल्याने दोन वोटिंग मशीन लावल्या जातील. तर १५ पेक्षा कमी उमेदवार असल्याने त्या ठिकाणी एक वोटिंग मशीन ठेवण्यात येणार आहे.
निवडणुकीवर करोडो रुपये खर्च
महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ९४ कोटी ९० लाख ५० हजार रुपये एवढी तरतूद आहे. याव्यतिरिक्त अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये मतदार याद्यांच्या छपाईसाठी ४० लाख तर मतपत्रिकांच्या छपाईसाठी १० लाख रुपये एवढी तरतूद करण्यात आली होती.
कर्मचारी ऑन ड्युटी
४२ हजार ९७९ कर्मचारी व ३५ हजार पोलिस निवडणुकीच्या कामात असणार आहेत. निवडणुक कामासाठी मतदान केंद्रावर साहित्य व मनुष्यबळ पोहचवण्यासाठी बेस्टच्या ७२४ बसगाड्या, मुंबई प्रादेशिक वाहतूक विभागाकडून ३४४९ वाहने, परिवहन विभागाकडून २१०६ टॅक्सी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत
आचारसंहितेसाठी भरारी पथके
आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात १३ स्टॅटीक पथके, ९८ भरारी पथके; तर ३९ व्हिडीओ सर्व्हेलियन्स पथके यांचा समावेश आहे. ही सर्व पथके उपायुक्त (अतिक्रमण निर्मुलने) यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहेत.
पेड़न्यूजवर कारवाई
निवडणुकीदरम्यान पेड़ न्यूजच्या तीन तक्रारी निदर्शनास आल्या आहेत. याबाबत पालिकेने स्थापन केलेल्या पेड न्यूजबाबतच्या समितीने राज्य निवडणुक आयोगाकडे आपला अहवाल सादर केल्यावर तीन वृत्तपात्रांच्या प्रकाशकांना आणि उमेदवाराला नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. याबाबत पुढील चौकशी सूरु असून उमेदवार व प्रकाशक यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त
अतिसंवेदनशील मतदान केंद्र
* प्रभाग क्रमांक २२१ ,मध्ये दोन (सहावे )मतदान केंद्र - दि मुस्लिम कची खत्री जमतखाना, १६२ बापू खोटे मार्ग, मुंबई ४००००३
* प्रभाग क्रमांक २२१ मध्ये दोन (सातवे )काठियावाडी मन्सुरी जमातखाना ट्रस्ट, तळमजला, २२७, अली उमर स्ट्रीट, मुंबई ०३
* प्रभाग २२१ मध्ये दोन (आठवे )म्युनिसिपल उर्दू शाळा, अब्दुल कादिर हाफीझुल्ला मार्ग, मुंबई ०३
* प्रभाग क्रमांक २२४ (२२४/२१ ते २२४/२२)कामू जाफर सुलेमान मुलींची शाळा, १७८ कांबेकर मार्ग, मुंबई ०३
* प्रभाग २२४ मध्ये तीन (२२४/२३ ते २२४/२५)कांबेकर मार्ग, महापालिका शाळा. कांबेकर मार्ग, मुंबई ०३
* प्रभाग २२४ मध्ये सहा (२२४/२६ ते २२४/३१) कटची मेमन जमतखाना, १३१, कांबेकर मार्ग, मुंबई ०३