Join us

आरोपींकडे पोलिसांची बंदूक

By admin | Published: October 13, 2015 3:12 AM

नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्याकांडात सातारा कनेक्शन समोर आल्याने साताऱ्यामधील गुन्हेगारी हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

मनीषा म्हात्रे, मुंबईनरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्याकांडात सातारा कनेक्शन समोर आल्याने साताऱ्यामधील गुन्हेगारी हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. संशयास्पद हालचालीवरून साताऱ्यातील वाहतूक पोलिसांनी सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून सात जिवंत काडतुसांसह एक बंदूक पोलिसांनी हस्तगत केली आहे. ती बंदूक नवी मुंबईच्या निवृत्त वरिष्ठ निरीक्षकाची असल्याची धक्कादायक माहिती त्यांच्या चौकशीतून उघड झाली. या बंदुकीचा वापर ते कशासाठी करणार होते, याबाबत सातारा पोलीस अधिक तपास करीत आहे. त्यांच्याकडे आढळलेल्या बंदुकीचा परवाना नव्हता. या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच ती बंदूक नवी मुंबई येथील एनआरआय पोलीस ठाण्याचे निवृत्त वरिष्ठ निरीक्षक विष्णू रेडकर यांची असल्याची माहिती समोर आली. बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून सातारा पोलिसांनी रुपेश कळत्रे (२८), खलील म्हात्रे (२१), स्वप्निल कोळी (२८), अमित झा (२१), सूरत ठाकूर (२४), मोहन कोळी (२१) आणि विनय यांना अटक केली आहे. हे सातही जण पनवेल येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी रेडकरांनाही चौकशीसाठी बोलवले असून, त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता ढेबेवाडी पोलिसांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली आहे. नवी मुंबई येथील एनआरआय पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी असलेले विष्णू रेडकर जुलै महिन्यात निवृत्त झाले. निवृत्तीनंतर पनवेल परिसरात विकासकासोबत भागीदारीमध्ये ते काम पाहत आहेत. या प्रकरणी त्यांच्याकडे विचारणा केली असता, शनिवारी पनवेल येथील कार्यालयामध्ये बंदूक विसरल्याचे त्यांनी सांगितले. ती बंदूक त्यांची खासगी असून, या तरुणांनी त्यांना न सांगता ती बंदूक सोबत नेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी ते स्वत: अधिक माहिती घेत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.