कंपनीचा आराेप; उच्च न्यायालयात याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रिपब्लिक टीव्ही नेटवर्कची मुख्य कंपनी एआरजी आउटलायरने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पोलिसांकडून छळ करण्यात येत असल्याचा आराेप करून या छळापासून संरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. टीआरपी घोटाळा प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पदाचा गैरवापर केला, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
अर्णब गोस्वामी यांनी गुन्हा रद्द करण्याबाबत केलेल्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत टीआरपी घोटाळा प्रकरणाच्या तपासाला स्थगिती द्यावी, तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली.
रिपब्लिक टीव्ही नेटवर्कच्या डिस्ट्रिब्युशन विभागाचे सहायक उपाध्यक्ष घनश्याम सिंग यांना पोलिसांनी अटक केली आणि १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ते सतत पोलीस ठाण्यात पोलीस चौकशीस हजर राहात असतानाही त्यांना अटक करण्यात आली, असे कंपनीने अर्जात म्हटले आहे.
पोलिसांनी सिंग यांना स्वतंत्र खोलीमध्ये नेऊन त्यांचा शारीरिक छळ केला. त्यांना पट्ट्याने मारहाण केली. त्यांना मारहाण करणे, हे पूर्वनियोजित होते. ते पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले. सिंग यांना मानसिकही त्रास देण्यात आला. त्यांना खोटा जबाब देण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. तसेच प्रिया मुखर्जी या महिला कर्मचाऱ्यालाही पोलिसांनी वारंवार चौकशीसाठी बोलावले. तिच्या वैयक्तिक कामासाठी ती बंगळुरू येथे गेली असताना मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला अटक करण्याच्या हेतूने तिचे घर गाठले, असेही कंपनीने अर्जात नमूद केले आहे.
टीआरपी घोटाळ्याच्या तपासावर आपले नियंत्रण राहावे, यासाठी राज्य सरकारने राज्यात सीबीआयला बंदी घातली, असाही कंपनीचा आराेप आहे.
......................