मुंबईतील ३८ पुलांच्या आॅडिटसाठी पालिकेची धावपळ, फेरनिविदा मागवल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 04:43 AM2019-03-20T04:43:35+5:302019-03-20T04:43:52+5:30

हिमालय पुलाच्या दुर्घटनेस स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाईचा खोटा अहवाल कारणीभूत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे या आॅडिटरमार्फत केलेल्या अन्य ३८ पुलांच्या आॅडिटबाबतही संशय व्यक्त होत आहे.

The police has called for recruitment, recruitment of 38 bridges in Mumbai | मुंबईतील ३८ पुलांच्या आॅडिटसाठी पालिकेची धावपळ, फेरनिविदा मागवल्या

मुंबईतील ३८ पुलांच्या आॅडिटसाठी पालिकेची धावपळ, फेरनिविदा मागवल्या

Next

मुंबई  -  हिमालय पुलाच्या दुर्घटनेस स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाईचा खोटा अहवाल कारणीभूत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे या आॅडिटरमार्फत केलेल्या अन्य ३८ पुलांच्या आॅडिटबाबतही संशय व्यक्त होत आहे. अन्य पुलांच्या तपासणीतही देसाई कंपनीने हलगर्जी केल्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने या पुलांच्या फेरतपासणीसाठी तत्काळ निविदा मागविल्या आहेत.
महापालिकेने मुंबईतील २९६ पुलांचे दोन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल आॅडिट केले. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात नेमलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटरने अहवाल दिल्यानंतर पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र किरकोळ दुरुस्तीची शिफारस करण्यात आलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय हा पादचारी पूल गुरुवारी संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत सहा लोकांचा मृत्यू झाला, तर ३१ प्रवासी जखमी झाले.
स्ट्रक्चरल आॅडिटरने हा पूल चांगल्या स्थितीत असल्याचे जाहीर करून किरकोळ दुरुस्ती सुचविली होती. त्यामुळे या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटताच महापालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा एकदा आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूर्व व पश्चिम उपनगरातील पुलांचे आॅडिट करणाऱ्या कंपन्यांना पुन्हा एकदा आॅडिट करून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरासाठी नवीन स्ट्रक्चरल आॅडिटर

शहर भागात ३९ पुलांचे आॅडिट करणाऱ्या डी. डी. देसाईची शासकीय पॅनलवरून हकालपट्टी करण्यात येणार आहे. तसेच या आॅडिटरला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. या कंपनीचा संचालक नीरजकुमार देसाईला सोमवारी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे शहरातील ३८ पुलांच्या फेरतपासणीची तातडीने आवश्यकता असल्याने महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. त्यानुसार सात दिवसांमध्ये नवीन ठेकेदार नेमून या पुलांचे आॅडिट होणार आहे. एक महिन्यात सर्व पुलांची फेरतपासणी करून अहवाल सादर करावा. त्यात बदल असल्यास निदर्शनास आणावे. या कामाचा मोबदला संबंधित कंपन्यांना मिळणार नाही, असे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

हे आहेत पालिकेचे स्ट्रक्चरल आॅडिटर
पश्चिम उपनगर : मेसर्स सी. व्ही. कांड : १५७ पुलांची पाहणी- ७९ चांगल्या स्थितीत, ४२ छोट्या दुरुस्ती, २८ पुलांची मोठी दुरुस्ती- ८ पुलांची पुनर्बांधणी
पूर्व उपनगर : स्ट्रेकवेल डिझायनर अ‍ॅण्ड कन्सल्टन्ट प्रा. लिमिटेड : ६६ पुलांची पाहणी - १८ चांगल्या स्थितीत, २६ छोट्या दुरुस्ती, १४ मोठी दुरुस्ती, ८ पुलांची पुनर्बांधणी.
शहर भागातही फेरतपासणी
देसाई यांनी १७ पूल चांगल्या स्थितीत आहेत, ४३ पुलांची किरकोळ दुरुस्ती तर १९ पुलांची मोठी दुरुस्ती आणि ३ पूल पाडण्याची शिफारस केली होती. फोर्ट, भायखळा, मरिन ड्राइव्ह, डोंगरी, चंदनवाडी, दादर, वरळी, परळ येथील पुलांचे आॅडिट या कंपनीने केले होते.

हे पूल आहेत धोकादायक
तीनही स्ट्रक्चरल आॅडिटरने धोकादायक ठरविलेल्या १८ पुलांपैकी सात पाडण्यात आले आहेत. तर उर्वरित धोकादायक पूल पाडण्यासाठी महापालिकेला ठेकेदार मिळत नसल्याने ते काम रखडले. मात्र यापैकी काही पुलांचा उपयोग केला जात आहे. यामध्ये मरिन लाइन्स दक्षिणेकडील, मरिन लाइन्स उत्तरेकडील पूल, ओम्कारेश्वर मंदिर कांदिवली, विठ्ठल मंदिर, इराणीवाडी, रगडपाडा, एस.व्ही.पी. रोड कांदिवली, आकुर्ली रोड कांदिवली, खिराणी रोड साकीनाका, बर्वे नगर घाटकोपर प., हन्स बुर्ग मार्ग सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड, एस.बी.आय. कॉलनी दहिसर, वालभाट नाला, निरलॉन गोरेगाव पूर्व. या पुलांना तत्काळ पाडण्याचे, त्यांचा वापर बंद करण्याचे आदेश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दादर पादचारी पुलाचा हद्दीचा वाद; पुलावर अर्धवट छत

मुंबई : हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेने प्रशासन जागे झाले. महापालिकेच्या हद्दीत असलेल्या दादर स्थानकावरील चर्चगेट दिशेकडील पूर्व-पश्चिम जोडणारा पादचारी पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलावरील छत्र फक्त पश्चिम रेल्वे हद्दीत असून, मध्य रेल्वे हद्दीतील पुलावर छत नाही. त्यामुळे हद्दीच्या वादात प्रवाशांना मृत्यूच्या जाळ््यात अडकविले जात असल्याचे, प्रवासी संघटनेनांनी सांगितले.
पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकाच्या पादचारी पुलाचे काम पश्चिम रेल्वे प्रशासनद्वारे केले जात आहे. यासाठी महापालिकेकडून निधी मिळाला आहे़ त्याचा वापर करून या पुलाची डागडुजी करण्यात येणार आहे.
पुलावरील रॅम्प, पायºया, जिन्याचे काम केले जाणार आहे. तब्बल ९० दिवस या पुलाचे काम केले जाणार आहे. या पुलाचे काम पश्चिम रेल्वे हद्दीतील केले जाणार आहे. मध्य रेल्वे हद्दीतील पुलाचे काम करण्यात येणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली. या पुलाच्या पश्चिम मार्गाच्या हद्दीतील पुलावर छताची उभारणी केली आहे.
मात्र मध्य मार्गाच्या हद्दीत पुलावर छताची उभारणी केली नाही. त्यामुळे पुलावर अर्धवट छत आहे. प्रवाशांना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने छत उभारण्यात आले आहे.

खार रोड पादचारी पूल बंद

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड स्थानकावरील पादचारी पुलांच्या दुरूस्तीसाठी २० मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केला आहे. खार रोड स्थानकावरील चर्चगेट दिशेकडील एमसीजीएस पादचारी पुलांच्या पायºयांची बांधणी करण्यासाठी पूल बंद करण्यात आला आहे. या पुलाचे काम १८ मे पर्यंत होणार असून तब्बल ६० दिवस पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी इतर पुलाचा वापर करावा, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पुलाची दुर्घटना झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. पालिकेच्या हद्दीत असलेला हिमालय पादचारी पूल पडल्याने महापालिकेसह रेल्वे प्रशासन खरबडून जागे झाले असून पादचारी पुलांची दुरूस्ती करण्यास सुरूवात केली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन डाइव्ह, चर्नी रोड पुलांची दुरुस्ती करण्यात येत आहे.

पाच पूल पाडणार
मुंबई : ब्रिटिशकालीन आणि कमकुवत असलेल्या पाच पादचारी पुलांना जमीनदोस्त करण्यात येणार असून हे काम एप्रिल महिन्यांच्याअखेरीपर्यंत केले जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली. मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, विक्रोळी, भांडूप, दिवा आणि कल्याण या स्थानकावरील जुने आणि कमकुवत पूल पाडण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यापासून या पुलाचे पाडकाम केले जाणार आहे़

Web Title: The police has called for recruitment, recruitment of 38 bridges in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.