मुंबई : पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ लोकलमध्ये २४ वर्षीय तरुणीची छेडछाड, अश्लील बोलून शिवीगाळ केल्याप्रकरणी २४ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. रोशन पटेल असे आरोपीचे नाव असून त्याला नालासोपारा येथून अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी धावत्या लोकलमध्ये त्याने तरूणीचा विनयभंग केला होता.
दरम्यान, तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही तरुणी मालाडला राहते. ती कामानिमित्ताने चर्नी रोडला जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानकाजवळ येताच तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मुंबई सेंट्रल जीआरपी पोलिसांनी मुंबईतील चालत्या लोकल ट्रेनमध्ये एका २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी आयपीसी कलम ३५४ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पीडित तरूणी चर्नी रोड स्थानकातून ट्रेनमध्ये चढली आणि ट्रेन ग्रँट रोड रेल्वे स्थानकावर येताच आरोपी डब्यात आला आणि त्याने तिच्या दिशेने अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. अश्लील शब्द उच्चारून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता.
मुंबई-पनवेल लोकलमध्येही असाच प्रकार घडलेला...काही दिवसांपूर्वी देखील लोकलमध्ये असाच प्रकार घडला होता. पीडित तरुणी महिलांसाठीच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती. सकाळची वेळ असल्यामुळे महिला डब्यामध्ये जास्त प्रवासी नव्हते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने सीएसएमटी स्थानकात गाडीने वेग घेतल्यानंतर महिला डब्यात प्रवेश केला होता. दारूच्या नशेतील तरुणाने तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी मशीद बंदर स्थानकावर लोकलमधून उतरला आणि बाहेर पळून गेला होता.