मुंबई- राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंबंधित मलबार हिल पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर आज धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रेणू शर्मा असं या महिलेचं नाव आहे.
फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान एका परिचित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून खंडणीची मागणी केली. या महिलेने आपल्याकडे पाच कोटी रुपये आणि पाच कोटी रुपयांचं दुकान तसेच एक महागडं घड्याळ मागितल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास बलात्काराची तक्रार करण्याची तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी रेणू शर्माने दिल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी फक्त एक कागद सोशल मीडियावर टाकल्यानंतर तुमचं मंत्रिपद धोक्यात आलं होतं. मग आता माझी मागणी पूर्ण न केल्यास मी तुमची बदनामी करेन, असं रेणू शर्माने म्हटलं होतं. तसेच आपलं मंत्रिपद वाचवायचं असल्यास १० कोटी रक्कम काही जास्त नाही, असंही रेणू शर्माने धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलं होतं.
महिलेने केलेल्या मागणीनंतर धनंजय मुंडे यांनी सदर महिलेला परिचिताकरवी कुरियरच्या माध्यमातून ३ लाख रुपये आणि महागडा मोबाईल पाठवला होता. पण या महिलेने ५ कोटींसाठी तगादा लावला त्यामुळे अखेरीच धनंजय मुंडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सदर महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर रेणू शर्मा ही महिला मूळ इंदोर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रांच आणि इंदोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी इंदौर कोर्टात हजर केलं, इंदोर कोर्टानं तिचा ताबा दिला आणि त्यानंतर आज सदर महिलेला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. दरम्यान, सदर रेणू शर्मावर इतर अनेक व्यक्तींनीही ब्लॅकमेलिंग संदर्भातील तक्रारी यापूर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.