Join us

संदीप देशपांडे अन् संतोष धुरींच्या अडचणी वाढणार; पोलीस जुन्या खटल्यांची माहिती गोळा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 7:22 PM

मुंबई- मुंबईत दादर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन मनसेचे नेते संदीप देशपांडे ...

मुंबई- मुंबईत दादर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पसार होत असताना झालेल्या गदारोळात महिला पोलीस जखमी झाली होती. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेतला जात आहे.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जुन्या खटल्यांची माहितीही पोलीस गोळा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांच्या शिवाजी पार्कसह इतर ठिकाणच्या गुन्ह्यांची माहिती घेण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं आहे. त्यामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरींच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. 

संदीप देशपांडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली होती. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. आम्ही कायम पोलिसांना सहकार्य केलं आहे. पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही कायद्याचा आदर करतो. पण खोट्या केसेस करणार असाल, तर ते कदापि सहन करणार नाही, अशा शब्दांत देशपांडेंनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्वत:ची बाजू मांडली होती.

संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक-

संदीप देशपांडे पोलिसांच्या हातून निसटून जात असताना त्यांची कार दामटवणाऱ्या ड्रायव्हरला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. 

देशपांडेंनी सांगितला पोलिसी प्रोटोकॉल-

महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा, त्यामुळे त्या पडून जखमी झाल्याचा आरोप देशपांडेवर केला जात आहे. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 'आम्ही तिथून निघून गेल्यावर टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या. धक्काबुक्कीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं दाखवत होते. मात्र माझा धक्का त्या महिला पोलिसाला लागलाच नाही. फुटेजमध्ये तसं स्पष्ट दिसत आहे. माझ्याभोवती ७ ते ८ पुरुष पोलीस अधिकारी होते. पुरुष अधिकारी उपस्थित असताना एका पुरुषाला महिला अधिकारी पकडायला जात नाही, हा प्रोटोकॉल आहे,' याची आठवणही त्यांनी करून दाखवली.

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेपोलिस