मुंबई : नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘आॅनड्यूटी २४ तास’ राबणाऱ्या पोलिसांची घरासाठीची वणवण थांबणार आहे. ‘ई - आवास’ प्रणालीव्दारे आता केवळ एका क्लिकवर त्यांना शासकीय निवासस्थानाची निवड करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी मुंबई पोलिसांच्या ‘ई-आवास’ प्रणालीचे उद्घाटन, तसेच सांताक्रुझ येथील ४७ नवीन पोलीस निवासस्थानांचे हस्तांतरण करण्यात आले.या कार्यक्रमाला मुंबई उपनगराचे पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री विनोद तावडे, अभिनेते अमिताभ बच्चन, पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, अप्पर पोलीस आयुक्त मनोज शर्मा, पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिसांच्या घरांच्या वाटपासाठी बनविण्यात आलेल्या ‘ई-आवास’ प्रणालीमुळे शासकीय निवासस्थान मिळण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल. शिवाय सांताक्रुझ येथील या नव्या इमारतींमुळे पोलिसांना चांगल्या दर्जाची घरे मिळणार आहेत. तब्बल अडीच कोटींचा बाजारभाव असणारी ही घरे सरकारला २५ लाखांत तयार करून मिळाली आहेत. पोलिसांना स्वत:ची घरे मिळावीत यासाठी बिनव्याजी कर्ज आणि इतर सुविधाही राज्य सरकारकडून पुरविण्यात येत आहेत. या वेळी मुंबईची सुरक्षा आणि जागरुक मुंबईकर या दोन लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले.पोलिसांच्या मदतीसाठी सदैव तत्पर - अमिताभ बच्चनपोलिसांमुळे मुंबईत सुरक्षित असून, मला त्याचा अभिमान असल्याचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले. दहशतवादाचे बदलते स्वरूप ओळखून पोलीस दलात बदल होत आहेत. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्यातही बदल अपेक्षित आहेत. मुंबई पोलिसांनी उभारलेले शीघ्र प्रतिसाद दल (क्युआरटी) या बदलाचे उत्तम उदाहरण आहे. मुंबई पोलिसांसाठी मी कधीही मदतीस तप्तर असल्याचेही त्यांनी सांगितले.>अशी होणार निवासस्थानाची निवड...पोलीस आयुक्त सुबोध जयसवाल यांच्या संकल्पनेतून ‘ई-आवास’ प्रणाली तयार करण्यात आली आहे. या घरांसाठी एकदाच नोंदणी करावी लागेल. प्रत्येक महिन्यात रिक्त निवासस्थानांची यादी या प्रणालीत प्रसिद्ध करण्यात येईल. अर्जदारास १ ते ९ तारखेपर्यंत ४ निवासस्थानाकरिता पसंतीक्रम देता येणार आहे. या कालावधीत पसंतीक्रम कितीही वेळा बदलता येवू शकतो. प्रत्येक महिन्याच्या ३० तारखेला रिक्त निवासस्थानाची यादी बंद होईल; आणि ९ तारखेनंतर सेवाज्येष्ठतेनुसार अर्जदारांना निवासस्थानाचे वाटप केले जाईल.
आता एका क्लिकवर पोलिसांना घर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 6:17 AM