केलेल्या कामाचे चीज! पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:58 IST2025-01-26T10:57:14+5:302025-01-26T10:58:27+5:30
यंदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसरातील अधिकाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला.

केलेल्या कामाचे चीज! पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुष्टांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या नायनाटासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्याला सलाम म्हणून राष्ट्रपती पदकाची घोषणा दर प्रजासत्ताकदिनी होत असते. यंदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसरातील अधिकाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला.
आपल्या कामाची पोचपावती मिळाली, अभिमानाचा क्षण, अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली, अशा भावना या अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
हा अभिमानाचा क्षण आहे. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, २०१३ या वर्षी मी जेव्हा नागपूरमध्ये होतो त्यावेळीही माझा राष्ट्रपती पदकाने सन्मान झाला होता. आता दुसऱ्यांदा हा सन्मान प्राप्त झाला आहे.
रवीन्द्र कुमार सिंगल,
पोलिस आयुक्त, नागपूर
अशा सन्मानामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते आणि काम करण्याचा हुरूप वाढतो. आजवर केलेल्या कामाची ही पोचपावती
आहे.
चंद्र किशोर मीना, पोलिस महानिरीक्षक, एटीएस
पोलिस दलात केलेल्या कामाचा हा गौरव आहे आणि अर्थातच हा अभिमानाचा क्षण आहे. काम करताना वरिष्ठ आणि सहकारी यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
डॉ. आरती सिंग, पोलिस महानिरिक्षक, प्रशासन
या सन्मानाचे हे यश कॉन्स्टेबलपासून माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याची पोच आहे. या निमित्ताने मी त्यांचे आभार मानतो. हा पुरस्कार मिळाल्याचा मला निश्चित आनंद आणि समाधान आहे.
दत्ता कराळे,
पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र
हा सन्मान ही चांगल्या कामाची पोचपावती आहे. पोलिस दलातील सेवा आव्हानात्मक असते. कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्यामुळे माझे आई-वडील, पत्नी, दोन्ही मुली, माझे शिक्षक यांच्याप्रती मी कृतज्ञ आहे.
संजय दराडे, पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र
यशस्वीरीत्या कामे करताना एकूण ३३७ पदके प्राप्त झाली आहेत. नवी मुंबई येथे रवी पुजारी संघटित टोळीने केलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास केला. रत्नागिरी येथे पोक्सो, खुनाचे प्रयत्न अशा विविध प्रकरणांचा तपास करून आरोपींना शिक्षा देण्यात यश मिळविले होते.
अनिल लक्ष्मण लाड,
पोलिस उपअधीक्षक, पालघर
राष्ट्रपती पदकाने सन्मानित होणे, हा सर्वाेच्च आनंदाचा क्षण आहे. पोलिस सेवेत केलेल्या प्रमाणिक कार्याची ही पोचपावती आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. वरिष्ठांचा विश्वास आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली.
धर्मपाल बनसोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त, नवी मुंबई
पोलिस दलात ३५ वर्षे निष्कलंक सेवा बजावली. शासन आणि सामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवा दिली. त्याच प्रामाणिक सेवेचे राष्ट्रपती पुरस्काराच्या रूपातून चीज झाले. सर्व वरिष्ठ, सहकारी यांची आभारी आहे.
ममता डिसुझा,
सहायक पोलिस आयुक्त, ठाणे शहर
गेली ३५ वर्षे पोलिस खात्यात सेवा बजावल्याने हे राष्ट्रपती पदक आज जाहीर झाले. आपल्या कामाची थेट केंद्रीय पातळीवर दखल घेतली. त्यामुळे मोठे समाधान आहे.
- सुरेश मनोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण.
पोलिस सेवेतील हे उच्च पदक आहे. या सर्वोच्च पदकामुळे पोलिस सेवेत असल्याचे चीज झाले आहे. जनतेची सेवा करताना वरिष्ठांनी जे मार्गदर्शन केले त्याप्रमाणे जनतेची सेवा करीत आहे.
राजेंद्र कोते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळंबोली
राष्ट्रपती पदक मिळाल्याने अत्यंत आनंद झाला. २०० गुन्हे डिटेक्ट केल्याने मला हे पदक प्राप्त झाले. प्रामाणिकपणे पोलिस खात्यात काम केल्याने त्याचे चीज झाले आहे.
- जितेंद्र म्हात्रे,
सहायक पोलिस उपनिरीक्षक, पनवेल पोलिस ठाणे
गुन्हेगारी टोळीचा, आणि प्रवाशांच्या बॅगा लुटून नेणाऱ्या मध्यप्रदेशमधील गॅंगचा बीमोड केला होता, तर मोखाडा येथे एका महिलेचे धड टाकून फरार झालेल्या आरोपींना अटक करण्याची कामगिरी बजावली होती.
रवींद्र बाबूराव वानखेडे,
पोलिस उपनिरीक्षक, पालघर
गुणवत्तापूर्ण पोलिस सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाल्याने खूप समाधानी आहे. ३७ वर्षे केलेल्या कामाचे चीज झाले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच पुरस्काराचा मानकरी ठरलो.
महादेव काळे,
पोलिस उपनिरीक्षक,
विशेष शाखा, ठाणे शहर.