मुंबईत आता पोलिसांना आठ तास ड्युटी, आयुक्तांकडून ग्रीन सिग्नल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 09:05 AM2022-05-02T09:05:19+5:302022-05-02T09:05:55+5:30
पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांच्या ८ तास ड्युटीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मनीषा म्हात्रे
मुंबई : मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांच्या ८ तास ड्युटीपाठोपाठ पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांच्या ८ तास ड्युटीचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्तांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे लवकरच, ५० वर्षांखालील पोलिसांना ८ तास, तर ५० वर्षांपुढील पोलिसांसाठी १२/२४ चा फॉर्म्युला लागू करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतचे आदेश निघणार असल्याचे आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे पांडे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक असताना राज्यात महिला पोलिसांना आठ तास ड्युटीचे आदेश जारी केले होते. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मुंबई पोलिसांनी अद्याप त्याची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे पांडे यांनी पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात महिला पोलिसांना आठ तास ड्युटीची अनोखी भेट दिली आहे. त्यापाठोपाठ मुंबई पोलीस दलातील अंमलदार आणि अधिकाऱ्यांनाही ८ तास ड्युटी करण्याबाबतची मागणी वाढली. आयुक्तांनी याबाबत फेसबुक पोस्ट टाकून अधिकाऱ्याकडे विचारणाही केली होती.
साहेब, आमच्या ८ तासांचे काय ?
महिलादिनी मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांच्या ८ तास ड्युटीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सशस्त्र पोलीस दलातील महिलांना अद्याप ८ तास ड्युटीचा निर्णय लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे आमच्यासाठी वेगळा न्याय का? असा सवाल सशस्त्र पोलीस दलातील महिला पोलिसांकडून करण्यात येत आहे.