लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक शंकर पुजारीने गेल्या १५ वर्षांत १६ लाख ९० हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करत आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पुजारी सध्या मध्य नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना २०१५मध्ये पुजारीने तक्रारदार यांच्याकडे क्लब सुरू करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. एसीबीने सापळा रचून पुजारीला लाच घेताना रंगेहात अटक केली. त्यानंतर एसीबीने पुजारीची चौकशी सुरु केली. पुजारीने १ जानेवारी २००० ते २४ नोव्हेंबर २०१५ या सेवा कालावधीत एकूण उत्पन्नापेक्षा २८.५७ टक्के जास्तीची मालमत्ता जमा केली आहे. अखेर एसीबीने पुजारीविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.