पोलीस निरीक्षक बनले चालक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 02:32 AM2018-07-16T02:32:31+5:302018-07-16T02:32:39+5:30

मुंबई पोलीस दलाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू असल्याचे बिरुद मिरवले जात असतानाच शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांवर चालक बनण्याची वेळ ओढावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Police Inspector became the driver! | पोलीस निरीक्षक बनले चालक!

पोलीस निरीक्षक बनले चालक!

Next

- मनीषा म्हात्रे
मुंबई : मुंबई पोलीस दलाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू असल्याचे बिरुद मिरवले जात असतानाच शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांवर चालक बनण्याची वेळ ओढावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तर काही ठिकाणी निरीक्षकांनी गाड्या चालविण्यास नकार दिल्यामुळे या गाड्या धूळ खात पडल्या आहेत. आधीच पोलीस चालकांचा तुटवडा आणि त्यात अत्याधुनिकतेच्या नावाखाली प्रत्येक पोलीस ठाण्यात नव्याने सामील केलेल्या गाड्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोलिसांच्या दोन सत्रांत ड्यूटी असताना पोलीस बलाची कमतरता जाणवत होती. त्यात तीन शिफ्टमध्ये ड्यूटी करण्यात आल्याने दैनंदिन काम आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे नियोजन याचा ताळमेळ बसवण्यात पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाºयांची चांगलीच दमछाक होत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, गस्त घालणे, दाखल गुह्यांचा योग्य तपास करून गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवून पीडितांना न्याय मिळवून देणे, सोबतच प्रशासकीय कामकाज सुरळीत चालवणे अशी तारेवरची कसरत करावी लागते.
शहरात ९३ पोलीस ठाण्यांसोबतच गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, पोलीस प्रशासकीय विभाग असे अनेक कक्ष, विभाग आणि कार्यालये आहेत. तसेच पोलीस दलातील पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या वाहनांवर प्रत्येकी दोन चालक कार्यरत असतात. त्यात मुंबईत ४,५०० वाहने असून त्यासाठी फक्त १७०० चालक कार्यरत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात १, २, ३, ४, ५ आणि ६ अशा क्रमांकाने (मोबाइल व्हॅन) गाड्या आहेत. त्यात महिला सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या ५ क्रमांकाची गाडी रस्त्यावर गस्त घालताना दिसलीच पाहिजे, असे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिल्याने अन्य गाड्यांवरील चालक या गाडीवर देण्यात आले.
चालकांच्या कमतरतेमुळे पोलीस निरीक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात येत आहे. त्यामुळे तपास करायचा की वाहन चालवायचे अशा द्विधा मन:स्थितीत ते अडकले आहेत. याबाबत अनेक पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ निरीक्षकांनी तक्रारी केल्या. मात्र परदेशात पोलीस निरीक्षकही महत्त्वाच्या तपासावेळी चालक म्हणून भूमिका बजावतात, त्यात आपण ते काम केले म्हणून काय झाले, असाही सल्ला देऊन वरिष्ठांना गप्प करण्यात येत आहे.
>माहितीच मिळेना...
याबाबत पोलीस प्रवक्ते दीपक देवराज यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत माहिती घेऊन कळवतो, असे सांगितले. मात्र दोन दिवस उलटूनही त्यांनी माहिती देणे गरजेचे समजले नाही.
>दोन नव्या व्हॅनची भर
२७ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘डायल १००’च्या कार्यक्रमांतर्गत ५ आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मोबाइल सर्व्हेलन्स व्हॅनसहित प्रत्येक पोलीस ठाण्यात नव्याने दोन व्हॅनची भर घालण्यात आली. त्या ७ आणि ८ क्रमांकाच्या व्हॅन म्हणून ओळखल्या जात आहेत. मात्र या गाड्यांवर चालक कोठून आणायचा, असा प्रश्न वरिष्ठांना पडला आहे.

Web Title: Police Inspector became the driver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.