मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीलाच २२ लाख रुपयांची लाच स्वीकारताना गुन्हे शाखेच्या कक्ष १०चे प्रभारी पोलीस निरीक्षक आनंद सीताराम भोईर (४३) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. एसीबीने त्यांच्या मालमत्तेची कुंडली काढण्यासही सुरुवात केली आहे.भोईर यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यामुळे अनेक आयपीएस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाईन शॉपचे मालक आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्याचा तपास भोईर यांच्यामार्फत सुरू होता. या गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी भोईर यांनी २५ लाखांची मागणी केली. तडजोडीअंती २२ लाख देण्याचे ठरले. त्यापूर्वी तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. घडलेल्या प्रकारानंतर एसीबीने मंगळवारी सापळा रचला आणि २२ लाख रुपये स्वीकारताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्या.भोईर यांनी सेवेदरम्यान बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा संशय एसीबीला आहे. त्यानुसार, त्यांच्या मालमत्तेची माहिती एसीबीकडून काढण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात १९७ पोलिसांभोवती एसीबीकडून कारवाईचा फास आवळला गेला. लाचखोरीत महसूल विभागापाठोपाठ त्यांचा दुसरा क्रमांक आहे.
पोलीस निरीक्षक २२ लाख रुपयांची लाच घेताना जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 1:41 AM