कसाबला जिवंत पकडणारे पोलीस निरीक्षक संजय गोविलकरांचं निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:17 PM2019-08-10T13:17:07+5:302019-08-10T14:14:13+5:30
दुबईतून मुंबईत दाखल झाल्यानंतर भामलाला विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं.
मुंबई - मुंबईच्या २६/११ हल्ल्यात जिवंत पकडलेला आणि फाशी देण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब यास जिवंत पकडणाऱ्या राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस अधिकारी संजय गोविलकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. दाऊदचा हस्तक सोहैल भामला याला मुंबई विमानतळावरून जाऊ दिल्याप्रकरणी गोविलकर त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गोविलकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
दुबईतून मुंबईत दाखल झाल्यानंतर भामलाला विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, गेल्या आठवड्यात चौकशी केल्यानंतर भामलाला विमानतळावरून सोडण्यात आलं. त्यामुळे या आर्थिक गुन्हे शाखेत असलेल्या या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, भामला हा गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई पोलिसांच्या वॉन्टेड यादीत होता. मात्र, पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांनी केवळ प्राथमिक चौकशीनंतर भामलाला सोडून दिले होते. त्यानंतर भामला हा देश सोडून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यामुळे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी घडल्या प्रकराची गंभीर दखल घेत दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले.