मुंबई : बोरीवलीच्या कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे यांच्यासह चौघांवर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी ही कारवाई केली असून त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या एका बारवर त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे, पोलीस निरीक्षक अंबतराव हाके, पोलीस उपनिरीक्षक चेतक गंगे आणि हेड कॉन्स्टेबल शिवाजी चकणे अशी निलंबित करण्यात आलेल्या चार पोलिसांची नावे आहेत. बोरीवली पूर्व परिसरात ‘सूर संगीत’ या बारमध्ये अश्लील नृत्य तसेच चाळे केले जात असल्याची माहिती सावंत यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने या बारवर धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी २० ते २२ बारबाला अश्लील चाळे करत असल्याचे त्यांना आढळले. चकणे यांना या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे असा काही प्रकार या ठिकाणी होणार नाही यावर लक्ष ठेवणे त्यांचे कर्तव्य होते. मात्र त्यांच्या निष्काळजीपणामुळे बारमध्ये हे अश्लील प्रकार सुरू राहिले.रात्री दीड वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र हॉटेलमधील डीजे बारा वाजताच बंद झाला पाहिजे तसेच बारबालांना या ठिकाणी नृत्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यानुसार हे नियम मोडून एखाद्या पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत बार सुरू असल्याचे आढळल्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्या वेळी कर्तव्यावर असणाºया पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिले होते. त्यानुसार कस्तुरबा पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक संजीव पिंपळेसह चौघे निलंबित!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 6:02 AM