- जमीर काझी ।मुंबई : राज्य पोलीस दलामध्ये २०११ नंतर भरती झालेल्या हजारों पोलिसांना, गृहविभागाकडून नवरात्रौत्सवाची अनोखी भेट मिळाली आहे. त्यांच्या आंतर जिल्हा बदलीला मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, गरजू कॉन्स्टेबलना आता इच्छुक ठिकाणी बदली मिळणे शक्य होणार आहे.पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी ११ महिन्यांपूर्वी त्याबाबतचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविला होता. ‘लोकमत’ने याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर, विभागाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. डीजींना आता त्याबाबत निर्णय घेता येणार आहे.पोलीस दलात २०११ नंतर भरती झालेल्या उमेदवारांना जेथे नियुक्ती मिळाली आहे, तेथून कोणत्याही परिस्थितीत अन्य ठिकाणी आंतरजिल्हा बदली करावयाची नाही, असा धोरणात्मक नियम सरकारने घेतला. तशी अट उमेदवारांच्या नियुक्ती पत्रात घालण्यात आली. मात्र, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण व मागास भागातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आयुक्तालयात मोठ्या प्रमाणात उमेदवार भरती झालेले आहेत. त्यांच्या नोकरीची समस्या दूर झाली, तरी गावी राहात असलेले वृद्ध पालक आणि तेथील अन्य अडचणी प्रकर्षाने भेडसावू लागल्या, तसेच अनेक पुरुष किंवा महिला पोलिसांचे जोडीदार अन्य जिल्ह्यामध्ये नोकरीला आहेत. त्यांना स्वतंत्र राहावे लागत असल्याने, त्याचा मानसिक परिणाम पोलिसांच्या कामावर होऊ लागला आहे. त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर पोलीस महासंचालकांनी ही अट रद्द करून, त्यांनाही आंतर जिल्हा बदलीसाठी गृहित धरावे, याबाबतचा प्रस्ताव २८ आॅक्टोबरला गृहविभागाकडे पाठविला होता. मात्र, गृहविभागाच्या संथ कारभारामुळे पोल-५(ब)कडील फाइल तब्बल ११ महिने प्रलंबित होती. त्याबाबत प्रत्येक पोलीस घटकांतून इच्छुकांच्या अर्जाची छाननी करून, १५ फेबु्रवारीपर्यंत मागवून घेतले होते. त्याचे सुमारे १२ हजारांवर अर्ज मुख्यालयात पडून आहेत.राज्यात २०११ नंतर जवळपास २० हजार पोलिसांची भरती झाली आहे. गृहविभागाच्या मंजुरीमुळे त्यांच्या नियुक्तीतील नियम ३(२), (अ) उपखंड (अ)च्या अधीन राहून, इतर पोलीस घटकामध्ये बदलीसाठी पात्र ठरले आहेत. त्यासाठीची पात्रता, त्याची प्रक्रिया, सक्षम प्राधिकारी, सेवाजेष्ठता आदी निकषावर त्यांची इच्छुक ठिकाणी बदलीचा निर्णय महासंचालकांतर्फे घेतला जाणार आहे.यांना मिळणार प्राधान्यआंतर जिल्हा बदली करताना, पोलीस दाम्पत्य एकत्रीकरण, तसेच स्वत: कॉन्स्टेबल किंवा त्याचे जवळचे नातेवाईक गंभीर आजारी असणे, हे निकष महत्त्वाचे ठरणार आहेत.
पोलिसांच्या आंतरजिल्हा बदलीबाबतची अट रद्द, हजारो कॉन्स्टेबलना नवरात्रौत्सवाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 2:24 AM