मुंबई - डॅनियल या व्यक्तीची अमली पदार्थ प्रकरणी झडती घेण्याच्या नावाखाली त्याच्या खिशात हळूच एमडीची पुडी ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खार पोलिस ठाण्याच्या सब-पोलिस इन्स्पेक्टरसह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. हे सर्वजण खार पोलिस ठाण्याच्या दहशतवादविरोधी कक्षाचे अधिकारी आहेत.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडीओत सांताझ पूर्वच्या कलिना परिसरात ड्रग्जशी संबंधित उद्देशाने एका व्यक्तीची झडती घेण्यात येत असल्याचे दिसत आहे. तसेच या दरम्यान एक अधिकारी २० ग्रॅम मेफेड्रोन ताब्यात घेण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या खिशात एखादी वस्तू ठेवताना दिसत आहे. हा प्रकार ३० ऑगस्ट रोजी घडला असून याचा व्हिडीओ शनिवारी सर्वत्र व्हायरल झाला. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर ते चौघे खार पोलिस ठाण्याचे असल्याचे उघड झाले.
कायदेशीर पद्धतीचा अवलंब केला नाही- व्हायरल व्हिडीओमध्ये झडती घेताना कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करता संशयास्पद हालचाली करताना आढळल्याने त्या पोलिसांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिली.- सांताक्रुझच्या कलिना परिसरात शहबाज खान हे जनावरांचे फार्म चालवतात. त्यांच्याकडे जनावरांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. तर डॅनियल हा खान यांच्यासोबत काम करतो. त्याच ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली आणि सर्व प्रकार उघडकीस येऊन त्याची मुक्तता करण्यात आली.