दीर्घ चौकशीनंतर चिंतन उपाध्यायला पोलिसांनी सोडले
By admin | Published: December 17, 2015 02:39 AM2015-12-17T02:39:30+5:302015-12-17T02:39:30+5:30
हेमा उपाध्याय खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिंतन उपाध्यायकडे दीर्घ चौकशी केली आणि शहर सोडून जाणार नाही व चौकशीसाठी गरज असेल त्यावेळी हजर राहीन
- डिप्पी वांकाणी, मुंबई
हेमा उपाध्याय खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिंतन उपाध्यायकडे दीर्घ चौकशी केली आणि शहर सोडून जाणार नाही व चौकशीसाठी गरज असेल त्यावेळी हजर राहीन, या अटींवर त्याला बुधवारी सकाळी सोडून दिले. चिंतन सध्या चेंबूरमध्ये मित्रासोबत राहात आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांचे त्याच्या हालचालींवर लक्ष आहेच.
हेमा उपाध्याय आणि हरीश भांबांनी यांच्या खूनाचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत. गुन्हे शाखेतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याधर राजभर फरार असून त्याने निटकवर्तीय वा आप्ताला फोन केल्यास तो पोलिसांच्या जाळ््यात सापडेल. त्यामुळे त्याच्या अशाच एका फोनची पोलीस वाट पाहात आहेत.
बुधवारी सकाळी चिंतन कांदिवलीतील गुन्हे शाखेत आला होता. आमच्याकडे आला होता. आम्ही त्याला चहा व खाण्यास देऊन नंतर जायला सांगितले. ‘‘तू शहर सोडून जायचे नाही अशी विनंती आम्ही त्याला केली,’’ असे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. चिंतन उपाध्याय हेमा उपाध्यायच्या खूनात सहभागी नसल्याचा सध्या आम्हाला विश्वास आहे. तरीही त्याला क्लीन चिट देण्यात आलेली नाही, असे हा अधिकारी म्हणाला.
विद्याधर राजभरला ताब्यात घेण्यात एवढा उशीर का होतोय, असे विचारता हा अधिकारी म्हणाला की, विद्याधरने त्याच्या कोणत्याही परिचिताला मोबाईलवरून, लँडलाईनवरून किंवा एसटीडी बुथवरून फोन केला की आम्ही त्याला पकडू. स्थानिक पोलीसही विद्याधरच्या मागावर असले तरी त्यांनाही त्याने जेरीस आणले आहे. एखाद्या वेळी अत्यंत सराईत गुन्हेगाराला किंवा अंडरवर्ल्डमधील गुन्हेगाराला पकडणे सोपे असते. कारण त्याच्या हालचाली वा गुुन्हे करण्याची पद्धत माहिती असते. परंतु नव्यानेच गुन्हे केलेल्याला पकडणे कठीण असते, असे कांदिवली पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, विद्याधरच्या पत्नीची चौकशी सध्या पोलीस करीत आहेत. पोलीस विद्याधरच्या आईचेही म्हणणे नोंदवून घेत आहेत. ती गावाहून बुधवारी मुंबईत आली. ती म्हणाली आम्ही जे दुकान भाड्याने दिले होते त्यासंबंधात काही कागदपत्रे करायची राहिली होती, त्यासाठी ती तिकडे गेली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. दोन-तीन भागीदारांसोबत विद्याधरने इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचा व्यवसाय सुरू केला होता व तो प्रचंड तोट्यात गेला, असे समजते.
विद्याधर राजभर नेपाळमध्ये जाऊ शकत नाही कारण तेथील मधेशी समाजाच्या आंदोलनामुळे उत्तर प्रदेशातील गोरखपूरपासूनची सीमा बंद करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. पूर्वी अनेक फरार गुन्हेगार लपूनछपून नेपाळमध्ये गेले होते.
अटक करण्यासाठी चुरस
विद्याधर राजभरला कोण अटक करणार अशी चुरस सध्या गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांमध्ये आहे. या दुहेरी खून प्रकरणाची चौकशी करीत असलेले स्थानिक पोलीस अधिकारी सध्या चारकोप पोलीस ठाण्यात साक्षीदारांचे व आरोपींच्या कुटुंबियांचे म्हणणे नोंदवून घेत आहेत. याचवेळी गुन्हे शाखेचे पथकही विद्याधरच्या मागावर आहे.
भीतीमुळे तिघे पळाले
विद्याधर आणि साधू हे दोघे राजभर हेमा आणि हरीश भांबांनी यांच्या क्रेडिट कार्डसह पळून गेले होते परंतु त्यांनी गुन्ह्यातील इतर तीन साथीदारांना या कार्डबद्दल अंधारात ठेवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला अटक होईल या भीतीतून हे तिघे त्या दोघांना सोडून गेले होते. हे तिघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.