Join us

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर पोलिसांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:58 AM

देशभरात होत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी दिले आहेत.

मुंबई : जेएनयू प्रकरणाच्या निषेधार्थ देशभरात होत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी दिले आहेत. महाविद्यालये, विद्यापीठ परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी घटकप्रमुखांना केल्या आहेत.रविवारी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरात निषेध होत आहे. राज्यात मुंबईसह विविध महानगरे व लहान शहरांतही सामाजिक संघटना आणि महाविद्यालयीन विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनाला कसलेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी संबंधित घटकांशी बोलून चर्चा करावी, आंदोलकांवर आक्रमक कारवाई करू नये, अशा सूचना अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ यांनी सर्व पोलीस प्रमुख व घटकप्रमुखांना केल्या आहेत. आंदोलनाचा परिणाम सामान्य नागरिक व अन्य विद्यार्थ्यांना होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घ्यावयाची आहे.