‘थर्टीफर्स्ट’च्या जल्लोषावर पोलिसांची नजर; फौजफाटा तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 05:55 AM2018-12-30T05:55:20+5:302018-12-30T05:56:48+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना या वेळी महानगरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

Police look at the thirtfirst's funeral; Faujfata deployed | ‘थर्टीफर्स्ट’च्या जल्लोषावर पोलिसांची नजर; फौजफाटा तैनात

‘थर्टीफर्स्ट’च्या जल्लोषावर पोलिसांची नजर; फौजफाटा तैनात

Next

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना या वेळी महानगरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ३१ डिसेंबरला महत्त्वाच्या तसेच प्रमुख ठिकाणांसह तब्बल ४० हजारांहून अधिक पोलिसांना बंदोबस्तासाठी नेमले जाणार असून रविवारी दुपारपासून नाकाबंदी करून तपासणी करण्यात येणार आहे.
शहर तसेच उपनगरातील पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक घडामोडीवर पोलीस नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाईल. वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, रॅश ड्रायव्हिंग’ विरोधी मोहीम राबविली जाणार असून मद्यपी आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जाईल.
महत्त्वाच्या ठिकाणी मुंबई पोलिसांबरोबरच राज्य राखीव दल, क्यूआरटी, दंगल नियंत्रण आदींची पथके सोमवारी सकाळपासून बंदोबस्तासाठी नेमली जाणार आहेत. या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत सर्व हॉटेल, बार व परमिटरूम खुले ठेवण्याची मुभा असली तरी तेथे तसेच सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन व तरुणींची छेडछाड करणाºयांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते मंजुनाथ शिंगे यांनी शनिवारी दिली.
कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच शहर, उपनगरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथकाद्वारे घातपातविरोधी तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय समुद्रकिनारी बोटीच्या साहाय्याने गस्त घालण्यात येणार असून येथील बोट पार्टीलादेखील बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई शहर तसेच उपनगरातील सर्व महत्त्वाचे चौक, गर्दीच्या ठिकाणी रविवारी सायंकाळपासून नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन करून वाहनांची तपासणी केली जाईल. हॉटेल, लॉजेस, गॅरेज, फार्महाउस आदी ठिकाणच्या आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या असून गैरकृत्यांची घटना घडल्यास त्यांना जबाबदार धरले जाऊन त्यांचे परवाने रद्द केले जातील.

पाच हजार सीसीटीव्हींद्वारे निगराणी
गेट वे आॅफ इंडिया, गिरगाव चौपाटी, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ व गोराई चौपाटी तसेच पवई तलाव, धार्मिक ठिकाणे, राजकीय नेत्यांचे पुतळे, मॉल्स आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बंदोबस्त असेल. याशिवाय येथे पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारे पोलीस नियंत्रण कक्षातून निगराणी ठेवली जाणार आहे. तरुणी, महिला तसेच अन्य नागरिकांनी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष, टिष्ट्वटर किंवा ७७३८१३३१३३ / ७७३८१४४१४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांची सुट्टी रद्द
नववर्षाच्या जल्लोषावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलीस दलातील ४० हजारांहून अधिक पोलीस ३१ डिसेंबरला ड्युटीवर असणार आहेत. मनुष्यबळ अपुरे पडू नये, यासाठी या दिवशी पोलिसांची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. १ जानेवारीला सकाळी आठ वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्ताच्या ड्युटीवर तैनात असतील.

नवे वर्ष धुंदीत नव्हे, शुद्धीत साजरे करा...
नवे वर्ष धुंदीत नव्हे, तर शुद्धीत साजरे करा, असे आवाहन करत नशाबंदी मंडळाने शनिवारी सीएसएमटी येथे जनजागृती केली. प्राण्यांच्या प्रतिकृती, फुगे, सेल्फी कॉर्नरसह पथनाट्यांचे सादरीकरण करत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास म्हणाल्या की, समाजात व्यसनाधीनता मोठे रूप धारण करत आहे. युवकांमधील व्यसनाचे प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनच्या नावाखाली बरेच तरुण पहिल्यांदाच व्यसन करतात. त्यांना व्यसनापासून परावृत्त करत निरोगी आयुष्याचा संकल्प करण्याचे आवाहन पथनाट्यातून करण्यात आले.
‘तंबाखूला ढिश्शूम’ या आशयासोबत सेल्फी काढून शेकडो तरुण-तरुणींनी हा फोटो त्यांच्या मित्र-मैत्रिणींना पाठवला. यावेळी सिद्धार्थ महाविद्यालय, महर्षी दयानंद महाविद्यालय, प्रजापिता ब्रह्मकुमारी यांनीही व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली.

Web Title: Police look at the thirtfirst's funeral; Faujfata deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.