Join us

रिडेव्हलपमेंटच्या फ्लॅटसाठी पोलिसाने गमावले ३३ लाख ! भामट्याची पत्नीही सामील

By गौरी टेंबकर | Published: January 05, 2024 4:04 PM

अंधेरी पोलिसात गुन्हा दाखल

मुंबई: स्वतःच्या मालकीचे मुंबईत घर नसल्याने भविष्यातचा विचार करत २०२२ मध्ये स्वतःचा घर घेण्याचे स्वप्न पोलिसाने पाहिले. त्यासाठी त्याने मेहनतीची मिळकत खर्ची घातली पण त्या बदल्यात त्यांना घर मिळाले नाही. पण ३३ लाखांचा चुना मात्र लागला. याविरोधात त्यांनी अंधेरी पोलिसात तक्रार दिल्यावर राजकुमार शिरोडकर नावाच्या भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्याची पत्नी देखील त्याला सामील असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

तक्रारदार विजय बोरसे (४४) हे गेल्या वीस वर्षापासून पोलीस खात्यात असून ते सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहेत. बोरसे यांच्या तक्रारीनुसार मुंबईमध्ये घराचा शोध घेत असताना राजू शर्मा नावाच्या व्यक्तीशी त्यांची ओळख झाली जो रॉंग टर्न मेहता या कंपनीत काम करत होता. ज्याने बोरसेना त्यांच्या कंपनीमार्फत बांधलेल्या विविध बिल्डिंगमधले फ्लॅट दाखवले. त्यापैकी काही त्यांना पसंत पडले नाही तर काहीची किंमत त्यांच्या आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक होती. दरम्यान अंधेरी पश्चिमच्या कृपाप्रसाद बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शिरोडकर याचा ४०२ क्रमांकाचा फ्लॅट विकायचा असल्याचे शर्माने बोरसेना सांगितले.

शर्माने २० मे रोजी बोरसे यांची शिरोडकर आणि त्याचा मित्र सुरेश कांबळे याच्याशी ओळख करून दिली. तिथे त्यांना सदर फ्लॅटची कागदपत्र दाखवण्यात आली आणि फ्लॅट पसंत पडल्याने त्याची किंमत ८० लाख ठरली. ते पैसे टप्प्याटप्प्याने देत उर्वरित रक्कम फ्लॅटचा ताबा घेताना कर्ज काढून देण्याचे बोरसेनी कबूल केले. बोरसेनी चेक आणि रोख रक्कमेच्या स्वरूपात जवळपास ३३.५ लाख रुपये शिरोडकरला दिले मात्र नंतर त्याने फोनच उचलले बंद केले. तो आजारी असून बोलू शकत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बोरसे त्याच्या घरी गेले तेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना भेटू दिले नाही.

व्यवहाराबाबत बोरसेनी सांगितल्यावर आमचा कोणताही व्यवहार झाला नसून आम्ही घर विकणार नाही असे ती म्हणाली. त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले तेव्हा आम्ही कोणाचेही पैसे घेतले नाही असे उत्तर तिने दिले. पुढे कांबळेना दोन वेळा भामट्याच्या घरी पोलिसाने पाठवले ज्यांना शिरोडकरच्या पत्नीने घरातही घेतले नाही. अखेर बोरसेनी अंधेरी पोलिसात धाव घेतली.