मुंबई : पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशिष्ट वय झाल्यानंतर वैद्यकीय चाचणी करण्यात येत असते. त्यासाठी शासनाच्या वतीने त्या ठराविक खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते. या वैद्यकीय चाचणीमुळे त्यांना काही आजार असतील तर ते लवकर कळून त्यावर निदान करून उपचार करणे शक्य होणार आहे. पोलिसांना या वैद्यकीय चाचण्या करणे आणखी सुखकर जावे याकरिता कोकण आणि मुंबई विभागासाठी तीन नवीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.
मुंबई आणि कोकण विभागातील काही ठराविक रुग्णालयांत पोलिसांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येतात. त्यामध्ये आता आणखी तीन नवीन रुग्णालयांची भर पडली आहे. यामध्ये वाशी, अंधेरी (पूर्व) आणि नाशिक येथील अपोलो क्लिनिकचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी वैद्यकीय चाचणी करणे सोयीचे होणार आहे.
खर्चाची प्रतिपूर्ती
४० ते ५० वयोगटातील गृह विभागातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी दर दोन वर्षांतून एकदा आणि ५१ आणि त्यावरील वयोगटातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची एकदा चाचणी करण्यात येते. त्यासाठी त्यांना अपवादात्मक बाब म्हणून ५ हजार रुपये खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते.
वेळेत उपचारासाठी
पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण असतो. त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी चाचण्या केल्या जातात. विशेष म्हणजे या चाचण्यांमध्ये एखादा आजार सापडल्यास त्यांना तत्काळ उपचार घेणे सहज शक्य होते.