पोलीस नाईक यांनी केले रक्तदानाचे अर्धशतक, अनेकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 06:42 AM2017-10-20T06:42:55+5:302017-10-20T06:43:11+5:30
ब-याचदा रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तसाठा उपलब्ध करून देण्यासाठी धावाधाव करावी लागते, तसेच आॅक्टोबर व मे महिन्यातही रक्ताचा तुटवडा भासतो. मात्र, याची त्वरित गरज ओळखून धावाधाव करणारे पोलीस नाईक पुंडलिक आव्हाड यांनी
मुंबई : ब-याचदा रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तसाठा उपलब्ध करून देण्यासाठी धावाधाव करावी लागते, तसेच आॅक्टोबर व मे महिन्यातही रक्ताचा तुटवडा भासतो. मात्र, याची त्वरित गरज ओळखून धावाधाव करणारे पोलीस नाईक पुंडलिक आव्हाड यांनी आतापर्यंत तब्बल पन्नास वेळा रक्तदान करून अनेकांना जीवदान देत रक्तदानाचे अर्धशतक केले आहे.
पुंडलिक आव्हाड हे मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. कोणाला तत्काळ रक्ताची गरज असेल किंवा कुठेही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले असेल, तर आव्हाड रक्तदानासाठी धावून जातात. गेल्या २० वर्षांत आव्हाड यांनी तब्बल ५० वेळा रक्तदान केले आहे. दोन मुली आणि पत्नी असे आव्हाड यांचे कुटुंब आहे. आव्हाड यांनी आजारपणामुळे मुलगा गमावला आणि मोठी मुलगी ज्ञानेश्वरी हिला हृदयविकार आहे. अशा परिस्थितीतही आव्हाड नेहमीच रक्तदानासाठी तत्पर असतात. वर्षातून किमान २ ते ३ वेळा ते रक्तदान करतात. त्यांच्या या समाजकार्याबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त अतुल पाटील यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला.
शिवडी विभागातील पोलीस मोटार परिवहन विभागातील पोलीस नाईक आव्हाड याविषयी सांगतात की, २००२ साली मुलीच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्या वेळेस रुग्णालयात दक्षिणेकडून आलेल्या एका कुटुंबाला त्यांच्या मुलीसाठी रक्ताची गरज होती. त्यांना ‘ओ पॉझिटिव्ह’ रक्तगटाचे रक्त हवे होते; पण पळापळ करूनही त्यांना रक्त मिळत नव्हते. त्या वेळेस कळले की, रक्तदान करणे किती महत्त्वाचे आहे.
मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात राहणा-या आव्हाड यांनी त्यांच्या तालुक्यातही बरीच रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. शिवाय, भविष्यातही रक्तदान करणार असल्याचे आव्हाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.