नवी मुंबईत पोलिसांनी दिली चोरीची दोनदा संधी
By admin | Published: June 28, 2015 12:54 AM2015-06-28T00:54:12+5:302015-06-28T00:54:12+5:30
पहिल्यावेळी चोरी करतानाचे सबळ पुरावे असूनही आरोपीला पकडण्यास हलगर्जीपणा केल्याने या संधीचा गैरफायदा घेत आरोपीने एकाच क्लिनिकमध्ये सलग दुस-यांदा हातसफाई केली.
नवी मुंबई : पहिल्यावेळी चोरी करतानाचे सबळ पुरावे असूनही आरोपीला पकडण्यास हलगर्जीपणा केल्याने या संधीचा गैरफायदा घेत आरोपीने एकाच क्लिनिकमध्ये सलग दुस-यांदा हातसफाई केली. कोपखैरणे सेक्टर १७ मधील निवेदिता क्लिनिकमध्ये हा प्रकार घडला. या घटनेने सुस्तावलेल्या पोलीस यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली.
क्लिनिकमध्ये मंगळवारी
रात्री चोरी झाली. बुधवारी २४ जून रोजी सकाळी हा प्रकार डॉ. अनिलकुमार डफडे यांच्या निदर्शनास आला. बंद दवाखान्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्याच परिसरातील तरुणाने हा प्रकार केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. यानुसार त्यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात जाऊन सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांना दाखवले.
यावेळी एका अधिकाऱ्याने त्या तरुणाला ओळखले देखील, परंतु दवाखान्यातून काही चोरीला गेलेले नसल्याच्या कारणावरून यावेळी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप डॉ. डफडे यांनी केला.
दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच तरुणाने दवाखान्यात चोरी केली. याही वेळी काही न मिळाल्याने त्याने एलसीडी टीव्ही सीसीटीव्ही फोडून नेला.
शुक्रवारी सकाळी पुन्हा दवाखान्यात पुन्हा चोरी झाल्याची
बाब डफडे यांच्या निदर्शनास
आल्याने त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर तपासला असता त्यामध्ये पुन्हा तोच तरुण आढळून आला. त्यामुळे संतप्त झालेल्या डफडे यांनी पोलिसांना सोबत घेऊन चोराचा शोध घेतला.
सुरज खंडागळे असे त्याचे नाव असून तो कोपरखैरणे सेक्टर १६ येथे भाडोत्री रहिवासी आहे. त्याच्यावर
गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त केला. मंगळवारीच चोराला अटक केली असती तर पुन्हा दवाखान्यात चोरी झालीच नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया डॉ. डफडे यांनी दिली. (प्रतिनिधी)