Join us  

Police News: पोलिसांच्या वायरलेस विभागाची झाली पुनर्रचना; नवे नावही मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 8:31 AM

Police News: महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेला बिनतारी संदेश (वायरलेस) विभाग  आता पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग (इन्फ्रास्ट्रक्चर, आयटी व ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट) या नावाने ओळखला जाणार आहे.

- जमीर काझी   मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेला बिनतारी संदेश (वायरलेस) विभाग  आता पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग (इन्फ्रास्ट्रक्चर, आयटी व ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट) या नावाने ओळखला जाणार आहे. या विभागातील विविध शाखा आणि तेथील प्रशासकीय व तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन त्यांची नावासह नव्याने पुनर्रचना करण्यात आली आहे.  त्याबाबतच्या प्रस्तावाला गृह विभागाने  नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे.

वायरलेस विभागाचे मुख्यालय  पुण्यात असून, ते प्रत्येक आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयाशी संलग्न  आहे.  राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी, कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या सूचना व  संदेश तातडीने  देण्याचे काम या विभागातर्फे  केले जाते. या विभागात प्रशासकीय बाबींच्या अनुषंगाने असलेली प्रक्रिया गुंतागुंतीची होती. ती सुलभ करून कामात अधिक  सुसूत्रता यावी, यासाठी विभागाची पुनर्रचना करून त्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव गेल्यावर्षी १४ जानेवारीला मंत्रालयात झालेल्या बैठकीत आला होता.

त्यानुसार २५ ऑगस्टला विभागाकडून आलेल्या प्रस्तावाला  राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे या विभागाला वायरलेसऐवजी पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग असे संबोधले जाणार आहे. 

पदांचा सुधारित आकृतिबंध नवीन सुधारित संरचनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि सध्या कार्यरत असलेल्या ३,९६२ मंजूर पदांची पुनर्रचना केली असून, त्यातील  पोलीस दलातील रद्द करण्यात आलेली सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) या संवर्गातील ३२१ पदे रद्द करून नव्याने २२८ पदे निर्माण केली आहेत. त्यानुसार   आता एकूण ३,८६९ पदांचा  सुधारित आकृतिबंध बनवला आहे.     

या विभागामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी व वाहतूक या दोन स्तरांवर काम केले जाते. त्यामध्ये प्रशासकीय कामातील अडथळा दूर व्हावा, तांत्रिक व प्रशासकीय बाबी व तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, पदोन्नती, सेवाज्येष्ठता बदल्यांबाबत सुसूत्रता राहावी, यासाठी पुनर्रचना केली आहे. सर्व विभागांशी संबंधित नाव देण्यात आले आहे.    - सतेज पाटील, गृहराज्यमंत्री.

टॅग्स :मुंबई पोलीसपोलिस