आरटीआय कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड-१९मुळे मृत्यू झालेल्यावर अंत्यसंस्कारासाठी पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) मागणी न करण्याच्या परिपत्रकाला रुग्णालय प्रमुख जुमानत नाहीत. कोविडचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यासाठी रद्द केलेल्या पोलिसांच्या दाखल्याची मागणी केली जात आहे, असा आराेप करत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे.
पालिकेने गेल्यावर्षी ३ ऑगस्टला कोविड - १९ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी न करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. ते मिळण्यासाठी विलंब होत असल्याने मृतदेह रुग्णालयातून स्मशानभूमीमध्ये नेण्यास वेळ लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आजही बीकेसी, सायन आणि टाटा रुग्णालयात या प्रमाणपत्राचा अट्टाहास केला जात असल्याचे गलगली यांनी केलेल्या तक्रारीत नमूद आहे.
बुधवार, २ मे रोजी जोगेश्वरी येथील उबादुल्ला या ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे कोविडमुळे सायन रुग्णालयात निधन झाले, पण त्यांचा मृतदेह मुलगा मुसव्वीर याला दिला जात नव्हता. ‘एनओसी’ची मागणी करण्यात आली. इक्बाल ममदानी व अनिल गलगली यांनी पालिका उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या निदर्शनास हा प्रकार आणल्यानंतर रुग्णालयाने मृतदेह ताब्यात दिला.
गलगली यांनी त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे, जे पालिकेच्या परिपत्रकाला न जुमानता मृत्यूनंतर व्यक्तीच्या नातेवाईकांना त्रास देत आहेत. परिपत्रक पालिकेचे असताना त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.