मुंबई : आदिवासींच्या जमिनीसाठी ठाणे ते मुंबई निघालेल्या उलगुलान मोर्चाला मदत करणाऱ्या विचारवंतांना आझाद मैदानात पोलिसांनी चार महिन्यांनंतर नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी ५०० आदिवासी महिलांसह २४ मार्चला आझाद मैदान पोलीस ठाण्यावर धडकणार असल्याचे सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.आदिवासींना मदत करणाºया शहरातील विचारवंतांवर गुन्हे दाखल करून मनोबल तोडण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप प्रतिभा शिंदे यांनी केला. त्या म्हणाल्या, आदिवासींनी हक्कासाठी २१ व २२ नोव्हेंबर २०१८ला ठाण्यापासून मुंबईपर्यंत काढलेल्या मोर्चात स्वत: पोलीस आयुक्तांसह सरकारचे मंत्री चालत होते. त्या वेळी कारवाई किंवा नोटीस प्रशासनाने दिली नाही. याउलट मुख्य सचिवांनी आदिवासींच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र चार महिन्यांनंतर ५ मार्चला संबंधित विचारवंतांनी पुलवामा हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी अचानक दंगलीचे कलम लावत पोलिसांनी संबंधितांना मोर्चाला मदत केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. धक्कादायक म्हणजे मोर्चाचे नेतृत्व करणाºया शिंदे यांचे नाव नोटीसमध्ये नाही. त्यामुळे हा सर्व बनाव करण्यात आला आहे. संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करा किंवा आमच्याविरोधातही गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत शेकडो आदिवासी महिला आझाद मैदान पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचे लोकसंघर्ष मोर्चाने स्पष्ट केले.
उलगुलान मोर्चाला मदत करणाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 6:10 AM