मुंबई - मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणीला धमक्या दिल्या जात असल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली होती. करिश्मा भोसले नावाच्या तरुणीनं मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र, मशीद परिसरातील व्यक्तींनी तिला विरोध करत वाद घातला. यानंतर तिला धमक्या देण्यात आल्या. यावरून आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि मनसे यांच्यात जुंपली होती. याप्रकरणी आता मुंबईच्या मानखुर्द पोलिसांनी करिश्मा भोसलेला नोटीस बजावली आहे.
करिश्मा भोसलेनं मशीद परिसरात नेमकं काय घडलं, याची माहिती देणारा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला. '२४ जूनला दुपारी ३ वाजता मी मशीद परिसरात गेले होते. त्यांनी मला पाच वाजता येण्यास सांगितलं. मी तिथे जाऊन त्यांना भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी वाद घातला. आमचं कोणासोबत शत्रुत्व नाही. अझानलाही आमचा विरोध नाही. पण, लाऊडस्पीकरवरील अझानला विरोध आहे,' अशा शब्दांत करिश्मानं तिची भूमिका स्पष्ट केली. 'या भागात हिंदू मुस्लिम सोबत राहतात. पण काहीजण अझानच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण करत आहेत. आम्ही इथेच राहतो आणि इथेच राहणार आहोत. आम्ही सत्यासोबत असून संविधान आमच्यासोबत आहे. जे आम्हाला मदत करू इच्छितात, त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं. अनधिकृत लाऊडस्पीकरला विरोध करावा,' असं आवाहन तिनं केलं. करिश्मा भोसलेनं मशिदीतील काही व्हिडीओ ट्विट केले आहेत. यामध्ये तिचा काही मुस्लिम महिलांशी वाद होत असताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओत पोलीस करिश्मा आणि मुस्लिम व्यक्तींना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. आता, याप्रकरणी राजकारण पेटलं असून पोलिसांनी मशिदीच्या समितीला समजावून सांगण्याऐवजी करिश्मालाच नोटीस बजावली आहे.
मला सातत्याने धमक्या येत असून मला पोलिसांनी नोटीस का बजावली, हे अद्यापही समजले नाही. विशेष म्हणजे मस्जीद समितीने अद्यापही लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला नाही, असे करिश्माने म्हटलं आहे.
दरम्यान, मशिदींवरील भोंग्यावरून मानखुर्दमध्ये राजकारणदेखील पेटलं आहे. मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी करिश्मा भोसले यांच्या लढ्याला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. 'आम्ही करिश्माची भेट घेतली. या लढ्यात राज ठाकरे तिच्यासोबत असल्याचं आश्वासन दिलं. घर सोडण्यासाठी अबू आझमींसारखी माणसं तिला धमक्या देत आहेत. अशा फुटकळ लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही. राज्यभरात मशिदीवर अनधिकृत भोंगे वाजतात. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. पण सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूंनींच पाळायचा का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंदूंना नियम सांगितले जातात. मात्र इतर धर्मीयांना त्यामधून सूट दिली जाते. मशिदीवर पहाटे ४ वाजता भोंगे वाजतात. त्याचा त्रास इतरांना होत असतो. याविरोधात करिश्मानं आवाज उठवला आहे. तिला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, तर गाठ महाराष्ट्र सैनिकांशी आहे, असा इशाराच जाधव यांनी दिला.
दरम्यान, ध्वनी प्रदुषण कायदा 2000, हा पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत येतो. त्यानुसार, रहिवाशी परिसरात आवाजाची तीव्रता सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 55 डेसीबल, तर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 45 डेसिबलपर्यंतच ठेवण्याचं बंधनकारक आहे. तर, अशाचप्रकारे व्यवसायिक क्षेत्र, औद्योगिक परिसरांना सायलेंड झोन घोषित करण्याचे निर्देश आहेत.