मुंबईः मनसेचे नेते नितीन नांदगावकर हे नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरताना दिसतात. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यातही ते पुढे असतात. त्यांच्या वेगळ्या स्टाइलनं ते मुजोर रिक्षाचालकांपासून रस्त्यांवरून नियमांचे पालन न करता गाडी चालवणाऱ्या चालकांना शिस्त लावण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे जनतेतही ते लोकप्रिय आहेत. आता पोलिसांनी त्यांच्याविरोधात तडीपारीची नोटीस बजावली आहे. परंतु पोलिसांच्या या तडीपारीच्या नोटिसीविरोधात मनसे कार्यकर्ते एकवटले असून, सोशल मीडियावरूनही मुंबई पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला जातोय.
नितीन नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत, मनसेच्या माध्यमातून नितीन नांदगावकर यांनी मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी नेहमीच लढा दिला. मनसे स्टाईलने सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ते सदोदित करत असतात. नितीन नांदगावकर हे गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आठवड्यातील दर बुधवारी ‘जनता दरबार’ भरवतात, नितीन नांदगावकर यांच्या जनता दरबारात न्याय मागण्यासाठी असंख्य लोक गर्दी करतात. यापूर्वी असा ‘जनता दरबार’ कै. आनंद दिघे भरवत असत, पण त्यांच्या निधनामुळे ‘जनता दरबार’ बंद झाला होता. अखेर नितीन नांदगावकरांनी जनतेच्या न्यायासाठी तो जनता दरबार सुरू केला आहे.