शिवसेनेच्या वर्धापन दिन दोन वेळा साजरा करण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांनी एकमेकांवर टीकेचे आसूड ओढले. यानंतर २० जून हा गद्दार दिन साजरा करण्यासाठी ठाकरे गटाने तयारी सुरु केली होती. यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मुंबई पोलिसांनी नोटिसा पाठविल्या आहेत.
शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन तर ठाकरे गटाकडून गद्दार दिन साजरा केला जाणार आहे. यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मुख्य केंद्र मुंबई असल्याने मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. शिवसेनेच्या शाखांसमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये कायदा आणि सुव्यस्था बिघडवू नये, अशी ताकीद देण्यात आली आहे.
राऊत काय म्हणाले...या जगामध्ये युनायटेड नेशनच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे दिवस साजरे केले जातात. 20 जून हा देशातल्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस आहे. आईसारख्या शिवसेनेच्या पोटात खंजीर खुपसून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीस आमदारांनी या प्रकारची बेईमानी केली. या दिवशी गद्दारांना जोडे मारले पाहिजे. प्रधानमंत्री यांनी योगा डे साठी प्रयत्न केले होते. आता त्यांनी या जागतिक गद्दार दिनासाठी प्रयत्न करावेत असे संजय राऊत म्हणाले.