Join us

अ‍ॅफकॉन्सच्या अधिकाऱ्यांसह उपकंत्राटदारापुढे पोलिसांची नांगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 6:40 AM

कोट्यवधीच्या मुरूम चोरीचे प्रकरण : सेलू, सिंदी, दहेगाव ठाण्यात गुन्हे दाखल

नागपूर : नागपूर-मुंबई महासमृद्धी महामार्गाच्या कामात अ‍ॅफकॉन्स कंपनी व त्याच्या उपकंत्राटदार कंपन्यांनी सेलू तालुक्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतात अवैध खोदकाम करून माती व मुरूमाची चोरी केली आहे. या प्रकरणात सेलू तालुक्यातील सेलू, सिंदी, दहेगाव या पोलीस ठाण्यात तक्रार तर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी पोलीस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस यंत्रणेने या हायप्रोफाईल आरोपींसमोर नांगी टाकली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या या आरोपींच्या अटकपूर्व जामिनावरचा निर्णय वर्धा जिल्हा सत्र न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला आहे.कोझी प्रॉपर्टी प्रा. लि. च्या मालकीच्या १०३ एकर जागेसह अनेक आदिवासी शेतकºयांच्या शेतजमिनीत कुठलीही परवानगी न घेता खोदकाम करून मुरूम तसेच मातीची चोरी करण्यात आली आहे. हा चोरी केलेला मुरूम व माती समृद्धी महामार्गाच्या कामासाठी सर्रासपणे वापरण्यात आला. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात २२ आॅगस्टला अ‍ॅफकॉन्सचे अनिलकुमार बच्चू सिंग व उपकंत्राटदार एम पी. कस्ट्रक्शनचे आशीष दफ्तरी यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. १२ दिवस लोटूनही या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात सेलू पोलिसांसह जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेला यश आलेले नाही. केळझर व गणेशपूर शिवारातील कोझी प्रॉपर्टी प्रा. लि. च्या मालकीच्या जागेतून कुठलीही परवानगी न घेता मुरूम व मातीची केल्याची तक्रार कोझी प्रॉपर्टी प्रा. लि.च्यावतीने सेलू व सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर समृद्धी महामार्गाचे काम करणाºया अ‍ॅफकॉन्सचे कंपनीसह त्याचे उपकंत्राटदार असलेल्या आशीष दफ्तरीचा एक-एक प्रताप पुढे येत आहे. या दोघाही मोठ्या कंत्राटदारांनी संगनमत करून अनेक शेतकºयांच्या शेतजमिनी थेट खोदल्याचेही सदर तक्रारीनंतर पुढे आले आहे. शिवाय जादा नफा मिळविण्याच्या लोभात बोर नदीचे पात्रच क्षमतेपेक्षा जास्त खोदल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत स्पष्ट झाली आहे. तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांना सादर केला. त्यावर कारवाई प्रलंबित आहे. मुरूम चोरी प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात कोझी प्रॉपर्टी प्रा. लि. यांच्यावतीने २२ आॅगस्टला अ‍ॅफकॉन्सचे अनिलकुमार बच्चू सिंग व उपकंत्राटदार आशीष दफ्तरी यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ४४७, ४२७, १२० (ब), ३४ अन्वये गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली आहे. गुन्हा दाखल होताच या दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धावही घेतली. गुन्हा दाखल होऊन १२ दिवसांचा कालावधी लोटल्याचे आणि आरोपींना अद्यापही जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले नाही. ऐरवी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीला हुडकून काढण्यासाठी पोलीस विभाग आपल्या गोपनीय बातमीदारांना कामी लावतो. शिवाय तातडीने आरोपीला जेरबंदही केले जाते. परंतु, या प्रकरणात तसे होताना दिसत नाही.मुरूम चोरीचे राज्यातील सर्वांत मोठे प्रकरण; तपास मात्र मंदगतीनेविशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी मुरूम व मातीच्या चोरीचे हे प्रकरण असताना पोलीस विभागातील अधिकारी तपासाबाबत कुठे ढेप खात आहेत, हाच सध्या संशोधनाचा विषय ठरला आहे. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी या प्रकरणी विशेष लक्ष देत कट रचून चोरी करणाºया या आरोपींना तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त आदिवासी शेतकºयांनी केली आहे.मुरूम व माती चोरी केल्या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय संबंधित विभागांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. तो अहवाल अद्याप आम्हाला प्राप्त झालेला नाही. उच्च न्यायालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींना जेरबंद करण्यासाठी सध्यातरी कुठलीही चमू रवाना झाली नाही. - नीलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा. 

टॅग्स :नागपूरदेवेंद्र फडणवीसन्यायालय