पोलीस अधिकारी लाच घेताना अटकेत, २५ हजारांचा पहिला हप्ता स्वीकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 11:28 AM2022-05-27T11:28:49+5:302022-05-27T11:29:11+5:30
काशिमीरा पोलीस ठाण्यात २५ हजारांचा पहिला हप्ता स्वीकारला
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : बलात्काराच्या आरोपीला दोषारोपपत्रामध्ये मदत करण्यासाठी पाच लाखांची मागणी करून पहिल्या हप्त्यापोटी २५ हजारांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे याला काशिमीरा पोलीस ठाण्यातच गुरुवारी रंगेहाथ पकडण्यात आले.
मुनावर ऊर्फ मुन्ना हुसेन याच्यावर काशिमीरा पोलीस ठाण्यात २०२० मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे यांच्याकडे आहे. आरोपीने सतत तक्रारी करू नये म्हणून फिर्यादीशी समझोता करून देण्याबरोबरच आरोपीला दोषारोपपत्रामध्ये फायदा पोहोचवण्यासाठी भामरे याने पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.
आरोपी मुनावर याने याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची खात्री केल्यावर सापळा रचला. गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्यातच भामरे याने मुनावरकडून पहिला हप्ता म्हणून २५ हजारांची लाच स्वीकारली. एसीबीच्या पथकाने भामरे याला रंगेहाथ अटक केली. बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला फायदा करून देण्यासाठी पोलीस ठाण्यातच एका पोलीस अधिकाऱ्याने लाच घेण्याचे धाडस दाखवल्याने खळबळ उडाली आहे.