पोलिस अधिकाऱ्याने केले आमदारांना ब्लॅकमेल; एक महिन्याच्या आत चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 08:08 AM2023-07-27T08:08:14+5:302023-07-27T08:08:47+5:30
चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर
मुंबई : नाशिकमधील तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केलेे. आपल्याला ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केली. समाजात इज्जत राहावी म्हणून आपण त्यांची मागणी पूर्ण केली पण शेवटी आपण माईनकर विरुद्ध न्यायालयात गेलो, न्यायालयाने हे गुन्हे रद्दबातल ठरविले असे सांगत शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे व्यथा मांडली.
धमक्या द्यायचे, पैसेही मागायचे
दहा-दहा वर्षांपूर्वीची प्रकरणे काढून माईनकर मला धमक्या द्यायचे. पैशांची मागणी करायचे. समाजात प्रतिष्ठा राहावी म्हणून ते म्हणायचे ते ते मी करत गेलो. त्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. शेवटी न्यायालयाने मला दिलासा दिला. माईनकर यांच्याकडे पाच ते दहा कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याविरुद्ध असलेल्या लाचलुचपतीच्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करा, अशी कांदे यांनी केलेली मागणी फडणवीस यांनी मान्य केली.
‘मुजोर माईनकर यांनी आपल्याला कमालीचा त्रास दिला’ असे भाजपच्या देवयानी फरांदे म्हणाल्या. यावेळी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माईनकर यांची चौकशी सहपोलिस आयुक्तांमार्फत एक महिन्याच्या आत केली जाईल व तोवर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले जाईल असे सांगितले.
तक्रार करणाऱ्या महिलांवरच गुन्हे
देवयानी फरांदे यांनी, आपण अन्यायाची तक्रार घेऊन काही महिलांसह गेलो असता माईनकर यांनी त्या महिलांविरुद्धच गुन्हे दाखल केले, आपल्याला धमकी दिली. प्रचंड मानसिक त्रास होईल अशी त्यांची वागणूक होती असा आरोप केला.