Join us  

दोन बसमध्ये चिरडून पोलिस अधिकारी मृत्यूमुखी; सांताक्रूझच्या वाकोला परिसरातील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 6:40 AM

दोन बेस्ट बसमध्ये चिरडून झालेल्या अपघातात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात निरीक्षकपदी कार्यरत असलेले प्रवीण दिनकर (४३) यांचा मृत्यू झाला.

मुंबई :

दोन बेस्ट बसमध्ये चिरडून झालेल्या अपघातात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात निरीक्षकपदी कार्यरत असलेले प्रवीण दिनकर (४३) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. वाकोला पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर हे पोलिस लाइन सांताक्रूझ या ठिकाणी राहत होते. ते सकाळी न्यू मॉडर्न स्कूलजवळ वाकोला मशीद येथे पोहोचले. मात्र, त्यांच्या पुढील बसमधून प्रवासी उतरत असल्याने दिनकर थांबले होते. त्याच वेळी त्यांच्या मागून येणाऱ्या बेस्ट बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडीची धडक दिनकर यांना बसली. दिनकर दोन बसमध्ये दबले गेले आणि गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना औषध उपचारासाठी तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालय येथे नेण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, पोलिस उपायुक्त परिमंडळ ८, दीक्षित गेडाम, वाकोला पोलिस ठाणे तसेच मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी रुग्णालयात धाव घेतली. दिनकर हे मूळचे अहमदनगरचे असून, त्यांचा अंत्यविधी मूळगावी करण्यात येईल, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

पोलिस ठाण्याला अखेरची भेटगुरुवारी दिनकर यांना सुट्टी होती. त्यामुळे कुटुंबीयांना घेऊन ते अलिबागला फिरायला गेेले होते. त्यानंतर सहकुटुंब ते मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्याला आले होते आणि सकाळी त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजली. त्यामुळे मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.