Join us

पोलीस कर्मचारी कल्याण परिषदेला मिळेना ‘मुहूर्त’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 6:04 AM

महाराष्ट्र पोलीस दलाच्या राज्य स्तरावरील पोलीस कर्मचारीवृंद परिषदेला ‘मुहूर्त’ मिळेना झालेला आहे.

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाच्या राज्य स्तरावरील पोलीस कर्मचारीवृंद परिषदेला ‘मुहूर्त’ मिळेना झालेला आहे. लोकसभा निवडणुकांमुळे ४ मे रोजी होणारी नियोजित बैठक रद्द केल्यानंतर पोलीस मुख्यालयाकडून अद्याप नवीन तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.राज्यभरातील पोलिसांच्या विविध अडचणी व समस्यांबाबत या बैठकीत ठोस निर्णय होत असल्याने या परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. मात्र या तिमाहीची बैठकीची तारीख निश्चित न झाल्याने पोलीस अंमलदारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. राज्याचे पोलीसप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मुख्यालयात कर्मचारीवृंद परिषद घेऊन पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या समस्यांवर विचार केला जातो. त्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस घटकातून नियुक्त केलेले सदस्य या परिषदेत सहभागी होत असतात.या वर्षीची ५१ वी राज्य पोलीस कर्मचारीवृंद परिषद ४ मे रोजी घेण्याचे मार्च महिन्यात जाहीर करण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी पुढील तारीख निश्चित झाल्यानंतर कळविण्यात येणार होते. आता लोकसभेचे मतदान होऊन निकालही जाहीर झाला आहे. मात्र अद्यापही महासंचालक कार्यालयाकडून वृंद परिषदेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस अंमलदारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे. ही बैठक त्वरित घ्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.