मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या महिलेचा पोलीस पाठलाग करत असताना थरारक घटना घडली आहे. महिला आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून जात असताना रेल्वे रुळांवर पडली आणि त्याचवेळी समोरुन लोकल येत होती. एका पोलीस अधिकाऱ्यानं जीवाची पर्वा न करता आरोपी महिलेचे प्राण वाचवले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर हा सर्व प्रकार घडला. पोलीस महिला आरोपीला घेऊन जात होते. त्यावेळी महिला आरोपीने समोरुन येणारी लोकल गाडी पाहून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा हात झटकून आरोपी महिलेने प्लॅटफॉर्मवरुन उडी मारली. पण ती तोल जाऊन खाली पडली. त्यावेळीच समोरून लोकल ट्रेन येत होती. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी धाडस दाखवत ट्रेन येण्यापूर्वीच तिला ट्रॅकवरून बाजूला केलं. अर्जुन घनवट यांनी दाखवलेल्या धाडसाचं पोलीस दलात कौतुक केलं जात आहे.