- मनीषा म्हात्रे
मुंबई : कोरोनाच्या काळात कर्तव्यापलीकडे जाऊन खाकीतील अवलिया मुक्या जिवांसाठी झटत आहे. या पोलीस अधिकाऱ्याने आतापर्यंत ५०० हून अधिक प्राण्यांना मदत पोहोचवून त्यांचे प्राण वाचवण्याची कामगिरी केली आहे. तसेच त्यांनी प्राण्यांसाठी उभारलेल्या या लढ्यात पाल ग्रुप अंतर्गत दोन हजारांहून अधिक जणांची फौज तयार केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत पोलीस अधिकारी सुधीर कुडाळकर यांनी हे काम केले आहे.
१९९५ मध्ये राज्य पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झालेल्या कुडाळकर यांनी कफ परेड, भायखळा आणि सांताक्रुझ पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखा एक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) उल्लेखनीय सेवा बजावली आहे. लहानपणापासूनच प्राण्यांची आवड हाेती. अशात, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे बाहेर पडणे थांबले. रस्त्यावरील श्वान, मांजर यांच्यापर्यंत पोहोचणारी मदत थांबली. त्यामुळे सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांनी रस्त्यावरील मुक्या जिवांसाठी लढा उभारला.
महाराष्ट्रातील प्राण्यासंबंधित ७८ ते ८० ग्रुपमध्ये त्यांचा सहभाग आहे. यात त्यांना मार्गदर्शन करत त्यांनी गेल्यावर्षी २४ सप्टेंबर रोजी पाल ॲडॉप्शन नावाने व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. सुरुवातीला १६० सदस्य होते. या ग्रुपच्या माध्यमातून रस्त्यावरील आजारी प्राण्यांपर्यंत ते मदत पोहोचवत आहेत. सध्या मुंबईत असे एकूण ९ ग्रुप तयार करण्यात आले असून, यात दोन हजारांहून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहे.
दुसरीकडे प्राण्यांवरील वाढते अत्याचार पाहता त्यांनी नोव्हेंबरमध्ये २५ वकिलांची लीगल टीम तयार केली. या टीमच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुडाळकर सांगतात, आजही अनेक सोसायट्यांमधील रहिवाशांना मांजर, श्वानाला जेवण दिले तर ते खटकते. त्यामुळे खायला देणाऱ्या व्यक्तींना विरोध करण्याचे प्रकार घडतात. प्राण्यांना मारहाणीच्या घटनाही घडत आहेत. अशावेळी त्यांना कायद्याची भीती असणे गरजेचे आहे.
आपण जे करतो तो गुन्हा असल्याचे समजायला हवे. त्यांनी आतापर्यंत १२५ प्रकरणांपैकी ९० टक्के प्रकरणे मार्गी लावली आहेत, तर उर्वरित प्रकरणांवर काम सुरू आहे. कोरोनाच्या काळात प्रत्येकाने पुढे यायला हवे. आपली छोटीशी मदत त्यांचा जीव वाचवू शकते, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
अशी मिळते मदत
या ग्रुपमध्ये कुठे अपघात झाला किंवा एखाद्या प्राण्यावर अत्याचार झाल्याचे समजताच तत्काळ त्यावर मार्ग काढण्याबाबत चर्चा सुरू होते. कुडाळकर यांच्याकडून तत्काळ प्राण्यांपर्यंत मदत पोहोचवून रुग्णालयात दाखल केले जाते.
पुढे उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम रुग्णालयाकडून समजताच त्याबाबत ग्रुपवर मदतीचे आवाहन करण्यात येते. यात, कोणी किती मदत केली याच्या माहितीसह संबंधित प्राण्याच्या प्रकृतीबाबत सर्व अपडेट दिले जातात. कुडाळकर सांगतात, आजही मोठ्या प्रमाणात प्राणी संघटनांकडून मदतीच्या नावाखाली काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे अशाप्रकारे सर्व तपशील ठेवणे गरजेचे आहे.
कायद्याची भीती हवी
कुडाळकर सांगतात, प्राण्यांसंबंधित कायद्यांबाबत जनजागृती व्हायला हवी. प्रत्येकाने पुढे येऊन मदत करायला हवी. तसेच कायद्यातही अधिक कठोरता आणणे गरजेचे आहे.
शेल्टर उभारण्याचे स्वप्न
रस्त्यावर वावरणाऱ्या अंध, अपंग श्वानासाठी शेल्टर उभारण्याचे स्वप्न आहे. लवकर संस्था स्थापन करून हे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.