Join us  

पोलीस अधिकाऱ्यांना ‘पोस्टिंग’ची प्रतीक्षा

By admin | Published: January 05, 2016 2:50 AM

सहायक आयुक्त किंवा उपअधीक्षकपदी बढती मिळालेल्या राज्य पोलीस दलातील १२३ निरीक्षकांना आता प्रत्यक्ष नेमणुकीचे ठिकाण जाणून घेण्याची प्रतीक्षा आहे.

मुंबई : सहायक आयुक्त किंवा उपअधीक्षकपदी बढती मिळालेल्या राज्य पोलीस दलातील १२३ निरीक्षकांना आता प्रत्यक्ष नेमणुकीचे ठिकाण जाणून घेण्याची प्रतीक्षा आहे. पदोन्नती तर मिळाली, मात्र आता आपली नियुक्ती कुठे होते, याची सध्या त्यांना धास्ती लागलेली आहे. हव्या त्या ठिकाणी पोस्टिंग मिळावे, यासाठी मंत्री व राजकीय नेत्यांमार्फत काहींनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. बढती मिळालेले ४३ अधिकारी मुंबई पोलीस दलातील आहेत. यातील बहुतांश जण मुंबईत ‘पोस्टिंग’साठी प्रयत्नशील असल्याचे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.निवृत्तीला अवघा दोन, तीन वर्षांचा अवधी असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सोयीच्या इच्छित ठिकाणी बदली देण्यात यावी, असा संकेत आहे. मात्र गृह विभागाकडून या संकेताची अंमलबजावणी होते, की वशिल्यानंतरच सोयीचे ठिकाण मिळते, याकडे पोलीस खात्याचे लक्ष लागलेले आहे.पोलीस दलातील वरिष्ठ पदापासून ते कनिष्ठ पदापर्यंतच्या बढत्या अनेक महिन्यांपासून रेंगाळल्या होत्या. त्यापैकी अनेक जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने रिटायरमेंटपूर्वी प्रमोशनच्या प्रतीक्षेत होते. गृहविभागाने नववर्षाच्या पूर्वसंध्येला २०१३-१४च्या निवड सूचीतील १० व २०१४-१५ या वर्षातील ११३ अशा राज्यातील १२३ पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या केल्या आहेत. त्यांची सेवाज्येष्ठता निश्चित करून ‘पोस्टिंग’चे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार आहेत. (प्रतिनिधी)