मुंबई - अनेकदा महामार्गावर किंवा शहरातही फिरत असताना अगदी दुचाकी वाहनांपासून ते ब्रँडेड चारचाकी वाहनांवरही पोलीस अशी लाल रंगाची पाटील लिहिलेली आढळून येते. विशेष म्हणजे कुटुंबातील सदस्यांसाठी वापरण्यात येत असलेल्या खासगी, घरगुती वाहनांमध्येही अनेकदा अशी पाटी पाहायला मिळते. मात्र, खासगी वाहनांवर अशी पाटी लावल्यास कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकच मुंबई वाहतूक शाखेच्या पोलीस सह-आयुक्तांनी जारी केले आहे.
बहुतेक पोलीस अधिकारी, अंमलदार, त्यांचे नातेवाईक खासगी वाहनावर पोलीस अशी लाल रंगाची पाटी लावून त्यांचे वाहन चालवतात, अशा तक्रारी मुंबई वाहतूक शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र, अशा प्रकारे पोलीस पाटील लावून खासगी वाहन चालविण्यात येत असल्याबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून कारवाईचे निर्देशही दिले आहेत. सर्व नागरिकांना समान कायदा, यानुसार पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करणे हे पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे आहे. तसेच, अशी पोलीस पाटी असल्याने अनेकदा ही वाहने नाकाबंदी किंवा तपासणी नाक्यावर चेक न करताच पाठवली जाण्याची शक्यता असेत. त्यामुळे, नागरिकांच्या जीवाला धोका असून घातपाताचीही शक्यता नाकारता येत नाही, असे मुंबईच्या सह आयुक्तांनी 14 मार्च रोजी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
मुंबईतील सर्व प्रभारी पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या खासगी वाहनावरील पोलीस पाटी किंवा पोलिसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स काढून टाकण्याचे आदेश द्यावेत. तसेच, जर यापुढे संबधित पोलीस अधिकारी, वा कर्मचाऱ्याच्या गाडीवर तशी पाटी किंवा स्टिकर्स आढळून आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.