अवयव विक्रीस निघालेल्या शेतकऱ्यांच्या मागावर पोलिस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 07:55 AM2023-11-26T07:55:59+5:302023-11-26T07:57:18+5:30
Mumbai - हिंगोली जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकरी त्यांचे अवयव विकण्यासाठी मुंबईत रात्री उशिरा दाखल झाले. ते रविवारी मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत. हिंगोलीतून निघाल्यापासून पोलिस या ना त्या पद्धतीने त्यांच्या मागावर आहेत.
मुंबई - हिंगोली जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकरी त्यांचे अवयव विकण्यासाठी मुंबईत रात्री उशिरा दाखल झाले. ते रविवारी मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत. हिंगोलीतून निघाल्यापासून पोलिस या ना त्या पद्धतीने त्यांच्या मागावर आहेत.
शेतकरी आंदोलकांपैकी एक असलेले नामदेव पतंगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही हिंगोलीहून निघाल्यापासून पोलिस आमचा पिच्छा पुरवत आहेत. आम्हाला सतत फोन करून आमचा ठावठिकाणा विचारत आहेत. आमच्या आणि आमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन आम्ही अवयव विक्री आंदोलन करायला निघालो आहोत. आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही, तरीही आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे.
या दहा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आधीच निवेदन पाठविले आहे. कर्जबाजारीपणाला आम्ही कंटाळलो आहोत. आत्महत्या करण्यापेक्षा आम्ही अवयव विकू आणि आलेल्या पैशांतून कर्जमुक्त होऊन सन्मानाने जगू, असे हे शेतकरी सांगतात. मुंबईत रविवारी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याबरोबरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते मातोश्रीवर भेट घेणार आहेत.