व्यापाऱ्यांसह प्रमुख व्यक्तींसोबत पोलिसांचे ऑनलाइन चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:06 AM2021-04-14T04:06:29+5:302021-04-14T04:06:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पोलिसांनी व्यावसायिक, लोकप्रतिनिधींसह समाजातील प्रमुख व्यक्तींचे ग्रुप तयार करून राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधांबाबत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोलिसांनी व्यावसायिक, लोकप्रतिनिधींसह समाजातील प्रमुख व्यक्तींचे ग्रुप तयार करून राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधांबाबत अॅपद्वारे चर्चासत्र सुरू केले आहेत. यात, स्थानिक पातळीवरही बैठकांनी जोर धरला आहे. काेराेना प्रतिबंधात्मक निर्बंधांबाबत असलेली विरोधाची धार कमी होण्यास मदत होऊन याला नागरिकांचे सहकार्य मिळावे असा यामागचा हेतू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरकारच्या कडक निर्बंधांना व्यापारी वर्गाचा विरोध आहे. अशात या ऑनलाइन बैठकांमधून त्यांना त्यांच्या विभागातील कोरोनाचे भयानक वास्तव, सध्याची परिस्थिती, आरोग्य व्यवस्था आदींबाबत माहिती देत सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या निर्बंधांचे पालन करणे किती आवश्यक आहे याची जाणीव करून देत त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येत आहे.
यात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी आपापल्या अधिपत्याखालील क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, व्यावसायिकांचे व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच बिट चौक्यांच्या प्रमुखांचाही यात समावेश आहे. या ग्रुपमार्फत विविध ॲपद्वारे बैठकांवर जोर देण्यात येत आहे. यात विरोध कमी होताच निर्बधाची अंमलबजावणी करण्यासही सहज शक्य होईल. तसेच पुढे यातून कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी एक साखळी तयार होईल असाही विश्वास एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविला.