मुंबई : मानधनवाढीसह पेन्शन आणि इतर मागण्यांसह सामाजिक सुरक्षा देण्याची मागणी करण्यासाठी पोलीस पाटील आता मैदानात उतरणार आहेत. ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाची कामगिरी बजावणारे पोलीस पाटील शुक्रवारी आझाद मैदानात एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी पत्रकार परिषद घेत कामगार नेते शशांक राव यांनी ही माहिती दिली.राव म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून पोलीस पाटलांच्या मानधनात वाढच झालेली नाही. नागरिक आणि पोलिसांमधील दुवा म्हणून काम करणाºया पोलीस पाटलांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा दिलेली नाही. त्यामुळे विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघातर्फे धरणे आंदोलन करून सरकारला इशारा दिला जाईल. त्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही, तर राज्यव्यापी अधिवेशन घेऊन तीव्र आंदोलन उभे केले जाईल. संघाचे अध्यक्ष दीपक पालीवाल यांनी सांगितले की, २०१२ साली पोलीस पाटील यांचे मानधन ८०० रुपयांहून ३ हजार रुपये करण्यात आले. त्यानंतर निवडणुकीआधी झालेल्या पोलीस पाटील यांच्या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पोलीस पाटील यांचे मानधन ७ हजार ५०० रुपये करण्याचे आश्वासित केले होते. मात्र सरकार बदलले तरी पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ झालेली नाही. त्यामुळे किमान १० हजार रुपये मानधन देण्याची मागणी संघाने केलेली आहे.प्रवास भत्त्याचे काय झाले?पोलीस पाटलांना प्रवास भत्ता देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला होता. त्यासाठी निधीचीही तरतूद केली. मात्र तो निधी पोलीस पाटलांपर्यंत पोहोचला नसल्याचा गंभीर आरोप पालीवाल यांनी केला. ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी तत्काळ प्रवास भत्ता आणि मानधनवाढीचा प्रश्न मार्गी लावावा.तीन हजारांत कसे परवडणार?ग्रामीण भागात खून, बलात्कार किंवा कोणतीही गंभीर घटना घडल्यास पोलीस ठाण्यात माहिती पोहोचविण्याचे काम पोलीस पाटलाला करावे लागते. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यातही पोलिसांना पोलीस पाटील मदत करतात.या सर्व प्रकारात पोलीस ठाण्यात जाण्या-येण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात. मात्र या सर्व कामाच्या बदल्यात कोणताही अतिरिक्त भत्ता पोलीस पाटलांना मिळत नाही. त्यामुळे अवघ्या तीन हजार रुपयांत कसे परवडणार, असा सवाल संघाने उपस्थित केला आहे.
पोलीस पाटलांचे आज धरणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 1:40 AM