पोलिसांच्या गस्तीमुळे लालबाग, भायखळा परिसरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:07 AM2021-04-07T04:07:26+5:302021-04-07T04:07:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई – राज्य शासनाने लावलेल्या कठोर निर्बंधानंतर सायंकाळच्या वेळेस लालबाग आणि भायखळा परिसरात शुकशुकाट दिसून आला; ...

Police patrol in Lalbagh, Byculla area | पोलिसांच्या गस्तीमुळे लालबाग, भायखळा परिसरात शुकशुकाट

पोलिसांच्या गस्तीमुळे लालबाग, भायखळा परिसरात शुकशुकाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई – राज्य शासनाने लावलेल्या कठोर निर्बंधानंतर सायंकाळच्या वेळेस लालबाग आणि भायखळा परिसरात शुकशुकाट दिसून आला; मात्र सकाळच्या वेळेत भायखळा येथील भाजी मंडईत भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. भायखळा येथील मुख्य भाजी मंडई बाहेर सायंकाळाच्या वेळेस पोलिसांची गस्त असल्याने परिसरात शांतता दिसून आली, तर लालबाग परिसरात केवळ औषध विक्रेत्यांची दुकाने खुली असल्याचे दिसून आले.

लालबाग येथील पेरु कम्पाउंड आणि गणेशगल्ली परिसरात निवासी वसाहतींखाली येरझारा घालणाऱ्या तरुणांच्या टोळक्यांना पोलिसांनी कडक शब्दांत सुनावले, तसेच, निर्बंध-नियमांविषयी जनजागृतीसाठी लालबाग येथील श्रॅफ बिल्डींगच्या सिग्नलपासून भारतमाता येथील सिग्नलपर्यंत पोलिसांनी व्हॅनमधून उद्घोषणापर जनजागृती केली. शहरात कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. वेळोवेळी प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. अर्थातच, लालबागकरांनीही त्याला आता काहीशी साद दिल्याचे दिसते. विनामास्क फिरणाऱ्यांना पोलीस थेट ताब्यात घेत असल्याने स्थानिकांमध्ये धास्ती वाढली आहे. मुख्य बाजारपेठेसह अन्य ठिकाणी मास्क वापरणाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसते.

महापालिका व पोलिसांची पथके मुख्य बाजारपेठेसह निवासी वसाहतींमध्ये अचानक भेटी देत आहेत. पथके आल्यास लगेच सुरक्षित वावर राखत सॅनिटायझेशनची व्यवस्था दाखवित असल्याचे बाजारपेठांमधील काही दुकानांमध्ये दिसून आले. निवासी इमारतींच्या प्रवेशद्वाराच्या आत वा मुख्य रस्त्यापासून आतमधल्या बाजूला असणाऱ्या परिसरात तरुण मुले विनामास्क खेळतानाही आढळून आली, अशा समूहांना पोलिसांनी समज दिल्याचे दिसून आले. शिवाय, याविषयी निवासी वसाहतींच्या कार्यकारिणींना निर्दशनास आणून दिले आहे.

Web Title: Police patrol in Lalbagh, Byculla area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.