वयोवृद्ध महिलेवरील प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:48 AM2019-05-20T00:48:02+5:302019-05-20T00:48:04+5:30
केवळ जबाब नोंदविला : संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
मुंबई : मालाड येथे राहाणाºया तन्नकम कुरूप या ७८ वर्षीय वृद्धेवर प्राणघातक हल्ला होऊन नऊ महिने उलटले, तरी याबाबत दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाºया पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन या वृद्धेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले आहे.
दिंडोशी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत तन्नकम यांनी म्हटले आहे की, ७ आॅगस्ट, २0१८ रोजी दुपारी त्यांची सून मालविका कुरूप तळमजल्यावरील त्यांच्या फ्लॅटच्या बाल्कनीत मोबाइलचे नेटवर्क मिळण्याच्या प्रतीक्षेत होती.
त्याच वेळी त्यांच्या शेजारी राहाणारी स्मिता पांचाळ ही इमारतीबाहेर उभी होती. मालविका मोबाइलवरून आपली छायाचित्रे काढत असल्याचा संशय स्मिता पांचाळला आला आणि तिने शिवीगाळ करीत आपल्या घरावर दगडफेक केली. त्यात बाल्कनीच्या काचा फुटल्या आणि मालविकासह आपण गंभीररीत्या जखमी झाले.
या घटनेनंतर मोहन कृष्णन आणि स्मिता पांचाळ यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आणि दिंडोशी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
आपल्या घरावर हल्ला झाला असताना पोलिसांनी आपला मुलगा मोहन कृष्णनविरुद्ध दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करून आपल्यावर हल्ला करणाºया स्मिता पांचाळ हिच्याविरुद्ध भादंवि कलम ३0७, ३२४ आणि ३२६ अन्वये गुन्हा दाखल करावा, असे निवेदन पोलिसांना दिले. मात्र, पोलिसांनी तब्बल आठ महिन्यांनतर २९ एप्रिल रोजी तन्नकम कुरूप यांचा जबाब नोंदविला. तरीही अद्याप याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.