झोपडीदादाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईस पोलिसांची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:03 AM2017-08-24T04:03:09+5:302017-08-24T04:03:12+5:30
शहरातील अनधिकृत बांधकामे प्रभावीपणे रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे पोलीस आणि महापालिका आयुक्तांचे आदेश असतानाही या दोन्ही यंत्रणांकडून झोपडीदादांविरुद्ध ‘एमपीडीए’अन्वये कारवाई करण्याचे टाळले जात असल्याचे आढळत आहे.
मुंबई : शहरातील अनधिकृत बांधकामे प्रभावीपणे रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे पोलीस आणि महापालिका आयुक्तांचे आदेश असतानाही या दोन्ही यंत्रणांकडून झोपडीदादांविरुद्ध ‘एमपीडीए’अन्वये कारवाई करण्याचे टाळले जात असल्याचे आढळत आहे. मालाड येथील शाळेच्या राखीव भूखंड बळकावणाºया संदीप माने याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
उत्तर प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी ११ जानेवारी २00५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार एखाद्या व्यक्तीवर त्याने अनधिकृत बांधकामे केल्यास त्वरित एमपीडीएअन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. तरीही मालाड येथील संदीप माने याने अनेक अनधिकृत बांधकामे केल्याने त्याच्यावर एमआरटीपीअन्वये अनेकदा कारवाई करण्यात आली तरी एमपीडीएअन्वये मात्र कारवाई केली जात नसल्याने या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्र्यांपासून पोलीस आयुक्तांना सादर केले आहे.
माने याने मालाड (पश्चिम) येथे शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केले आहे. महापालिकेने वारंवार हे बांधकाम पाडूनही ते पुन:पुन्हा उभारल्याने महापालिकेच्या लेखी तक्रारीवरून मालाड पोलिसांनी मानेविरुद्ध एमआरटीपीअन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्याशिवाय मालाड आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पी/उत्तर विभागाच्या सहायक पालिका आयुक्तांनीही त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनीही ३ मार्च २0१४ रोजी पोलीस आयुक्तांना प्रतिबंधात्मक कारवाईबाबत पत्र पाठवले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, मानवाधिकार संघ, तत्कालीन उपमहापौर शैलजा गिरकर यांनीही मानेविरुद्ध एमपीडीएअन्वये कारवाई करण्याची मागणी केली होती. या सगळ््या तक्रारींची दखल घेऊन मानेविरुद्ध योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिषदेने केली आहे.
गोरेगाव विभागाच्या पोलीस आयुक्तांनी संदीप माने याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करून त्याला नोटीसही बजावली होती. मानेविरुद्ध २00९ पासून चिंचोली बंदर, एव्हरशाइन, टायोटा जंक्शन तसेच आजूबाजूच्या परिसरात आपल्या साथीदारांसह हाणामारी करणे असे गुन्हे दाखल आहेत.