मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी पोलिसांचे सुरक्षा कवच तयार आहे. मुंबईत असलेल्या ७ हजार २९७ मतदान केंद्रांपासून १०० मीटरवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या दिमतीला होम गार्ड, क्यूआरटी, एसआरपीएफच्या प्लाटून मुंबईत दाखल झाल्या आहेत. तसेच खबरदारी म्हणून ३ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई मुंबई पोलिसांनी केली आहे. मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि अंमलदारांस केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १२ तुकड्या, राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके, शीघ्र कृती दल, फोर्सवन आणि सिव्हिल डिफेन्स फोर्स मतदानाच्या ठिकाणांसह शहरात जागोजागी तैनात आहेत. मुंबईत एकूण ७ हजार २९७ मतदान केंद्रे आहेत. यातील ७२६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. तर १५९ संवेदनशील विभाग असून सर्व मतदान केंद्रांच्या शंभर मीटर आवारात जमावबंदीचे आदेश आयुक्तांनी जारी केले. (प्रतिनिधी)बंदोबस्तात वाढनिवडणुकीच्या काळात १८ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली असून तब्बल १८५ अवैध दारू विक्रीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. यंदाचे राजकीय वातावरण तापले असल्याने सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षासह वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून शहरातील सर्व छोट्या-मोठ्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. १२५ जण तडीपार मतदान दिनी सुरक्षेची खबरदारी म्हणून आतापर्यंत ३ हजार व्यक्तींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर १२५ लोकांना तडीपार करण्यात आले आहे.1100हून अधिक लोकांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे. यामध्ये 844जणांविरुद्ध वारंट जारी करण्यात आले आहे.
पोलिसांचे सुरक्षा कवच
By admin | Published: February 21, 2017 4:25 AM