मीरा रोड : भार्इंदर पश्चिमेस तिवरांच्या जंगलात उभारण्यात आलेल्या गावठी दारुच्या हातभट्या शोधून त्या उध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी आता गुगल नकाशाचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. भार्इंदरच्या राई भागातील हातभट्टीवर कारवाई केली. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या आदेशानंतर भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने हातभट्या उध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली. मुर्धा खाडी भागात दोन तर खोपरा भागातील दोन हातभट्या उद्ध्वस्त केल्या. या प्रकरणी अंकुश पाटील, भूषण पाटील व विलास भगत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, राई शिवनेरी येथे हातभट्टी लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु नेमकी हातभट्टी कुठे आहे व तिथे कसे पोहचायचे हे पोलिसांना कळत नव्हते. त्या अनुषंगाने हातभट्टी शोधून काढण्यासाठी पोलिसांनी गुगल नकाशाचा आधार घेतला. उपनिरीक्षक सागर चव्हाण व त्यांच्या पथकाने शनिवारी सुमारे दीड किलोमीटरची दलदल तुडवत गुगल नकाशाच्या मदतीने तिवरांच्या जंगलातील हातभट्टी गाठली. पोलिसांनी हातभट्टी उद्ध्वस्त करत तीन पिंपात भरलेली दारु नष्ट केली. या प्रकरणी प्रकाश पाटील (४०) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गुगलद्वारे पोलिसांनी उदध्वस्त केली हातभट्टी
By admin | Published: February 06, 2017 4:08 AM